कोरोना योद्ध्यांची धडपड निवृत्तीच्या उंबरठ्यावरही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:36 AM2021-05-15T04:36:40+5:302021-05-15T04:36:40+5:30

कुडाळ : जागतिक कोरोना महामारीच्या काळात पांढऱ्या वेशातील देवदूत साऱ्यांचाच आधार झाला. कोरोनाग्रस्तांचा जीव वाचवण्यासाठी सेवावृत्तीने डॉक्टर आणि त्यांचे ...

Corona warriors struggle even on the verge of retirement | कोरोना योद्ध्यांची धडपड निवृत्तीच्या उंबरठ्यावरही

कोरोना योद्ध्यांची धडपड निवृत्तीच्या उंबरठ्यावरही

Next

कुडाळ : जागतिक कोरोना महामारीच्या काळात पांढऱ्या वेशातील देवदूत साऱ्यांचाच आधार झाला. कोरोनाग्रस्तांचा जीव वाचवण्यासाठी सेवावृत्तीने डॉक्टर आणि त्यांचे सर्व आरोग्य विभागातील कर्मचारी आपली कर्तव्यभावना जपत आहेत. अशातच आपली निवृत्ती सात महिन्यांवर आली असतानाही कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक सुभाष लक्ष्मण फरांदे यांनी सेवावृत्तीने प्रामाणिकपणे आपली कर्तव्यभावना जोपासत सर्वांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

वयाच्या ५८ वर्षीही त्यांची आरोग्य सेवेसाठीची धडपड साऱ्यांनाच थक्क करणारी आहे.

गतवर्षात कोरोनाने साऱ्या जगाला हादरवले. आजही हीच परिस्थिती आहे. आशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला. याकाळात कोरोना नियंत्रणासाठी सुभाष फरांदे यांनी लोकांची कोरोना चाचणी करणे, त्यांना लसीकरण करणे, बाधित व्यक्तीच्या संपर्कातील लोकांची माहिती घेऊन ती साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करणे आदी आरोग्याच्या सेवेसाठी आपल्या वयाचा विचारही केला नाही. ज्या सेवेचे व्रत अंगिकारले आहे, ती सेवा अहोरात्र प्रामाणिकपणे बजावण्याची मनोधारणा ठेवूनच ते आजही कार्य करीत आहेत. याकरिता त्यांना कुटुंबाचीही मोठी साथ मिळत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांच्याबरोबरीने काम करणारे सहकारीच कोरोनाबाधित झाले. यावेळी परिसरात रुग्णांची संख्या वाढत होती. कोविड कामाचा ताणही वाढला होता. आशा परिस्थितीत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली इतर सहकाऱ्यांची मदत घेत परिस्थिती योग्यप्रकारे हाताळण्यासाठी प्रयत्न केले. सुरुवातीच्या काळात प्रत्येक गावागावांतील नागरिकांना याबाबत कोणती काळजी घ्यावी याविषयी जागृती करण्यात आली.

आपल्याला न थकता आरोग्य सुविधा देण्याचे काम आरोग्य विभागातील सर्वच कर्मचारी करत आहेत. यातही वयाची ५७ पूर्ण केलेले फरांदे काका प्रामाणिकपणे आपल्या सहकारी व अधिकारी यांच्या मदतीने सेवा बजावत आहेत. त्यांच्यासारखे अनेकजण आरोग्य विभागात आज जनतेच्या सेवेसाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता परिस्थितीशी दोन हात करत आरोग्यासेवेसाठी लढा देत आहेत. अशा या कोविड योद्ध्यांची सेवाभावी वृत्ती आणि प्रभावी कार्याचे शब्दांत वर्णनही अपुरेच आहे.

फोटो : जनतेच्या आरोग्यासाठी निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही कुडाळ आरोग्य केंद्रातील कर्मचारी सुभाष फरांदे हे आजही प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत.

Web Title: Corona warriors struggle even on the verge of retirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.