ढिसाळ कारभारामुळे कोरोना जिंकला व्यापारी हरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:44 AM2021-07-14T04:44:00+5:302021-07-14T04:44:00+5:30
पाचगणी : ‘लॉकडाऊन हटवा, व्यापारी जगवा’, ‘शासनाच्या नियमांचे पालन करू, व्यापार बंद करू नका व व्यापाऱ्याला उपाशी मारू नका’, ...
पाचगणी : ‘लॉकडाऊन हटवा, व्यापारी जगवा’, ‘शासनाच्या नियमांचे पालन करू, व्यापार बंद करू नका व व्यापाऱ्याला उपाशी मारू नका’, ‘माझा व्यवसाय, माझी जबाबदारी’, ‘न्याय द्या न्याय द्या व्यापाऱ्याला न्याय द्या’ अशा घोषणा देत सोमवारी पाचगणी व्यापारी महासंघाच्या वतीने मानवी साखळी करून प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला.
कोरोना संचारबंदीचे निर्बंध शिथिल करावेत, या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी सोमवारी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत हातात फलक घेऊन मूक आंदोलन केले. या आंदोलनापूर्वी व्यापाऱ्यांच्या दोन बैठका घेण्यात आल्या, त्यानुसार आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. पाचगणीच्या शिवाजी चौक येथील सर्व बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाच्या बाहेर प्रशासनाचा निषेध म्हणून हातात पाटी घेऊन आंदोलन केले. या आंदोलनात व्यापाऱ्यांच्या कुटुंबीयांनीदेखील सहभाग नोंदविला.
सलग दोन वर्षे व्यापार पूर्ण ठप्प आहे. अजून कोरोनासारख्या महामारीवर नियंत्रण मिळवलेच नाही. मात्र व्यवसाय बंद असल्याने व्यापारी आर्थिक गर्तेत फसला आहे. आता आपल्याला कोरोनाला हरवायचे आहे, व्यापाऱ्यांना नाही. शासनाचे सर्व नियम पाळत आम्ही व्यापार सुरू करू, अशी अपेक्षा या वेळी व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
फोटो : १३ पाचगणी
संचारबंदीचे निर्बंध शिथिल करावेत, या मागणीसाठी सोमवारी सकाळी पाचगणी येथील व्यापाऱ्यांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन मूक आंदोलन केले. (छाया : दिलीप पाडळे)