ग्रामीण भागात कोरोनात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:38 AM2021-05-24T04:38:29+5:302021-05-24T04:38:29+5:30
सातारा : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे चिंतेचे वातावरण बनले आहे. फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात ...
सातारा : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे चिंतेचे वातावरण बनले आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. विशेषकरून ग्रामीण भागात अधिक बाधित सापडले आहेत. माण, खटाव, कोरेगाव, फलटण तालुक्यातील अनेक गावांतही रुग्ण वाढले आहेत. यामुळे प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याचबरोबर अनेक गावांचे आठवडे बाजारही बंद करण्यात आले आहेत.
..........................................................
अस्वच्छतेमुळे दुर्गंधी
सातारा : शहरातील शेटे चौकामधील स्वच्छतागृहाशेजारी कचरा, घाण टाकण्यात येत आहे. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. संबंधितांनी या ठिकाणची स्वच्छता वारंवार करावी, अशी मागणी होत आहे. या ठिकाणी परिसरातील काही नागरिक कचरा, घाण आणून टाकतात, तर भटके श्वान हा कचरा विखरुन टाकत असतात. कधी कधी हा कचरा रस्त्यावर येतो. त्यामुळे संबंधितांनी येथील स्वच्छता वारंवार करण्याची गरज आहे.
\\\\\\\\\\\\\\\\\
वाहन अपघातामुळे
गतिरोधकाची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शहरातील नवीन प्रशासकीय इमारतीजवळ भरधाव वाहनांमुळे अपघात घडत आहेत. त्यामुळे येथील रस्त्यावर गतिरोधक उभारावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
येथील नवीन प्रशासकीय इमारतीजवळ चार रस्ते एकत्र आले आहेत. रस्ता चांगला असल्याने वाहनांचा वेग अधिक असतो. त्यातच आडव्या बाजूंनी येणारी वाहने दिसत नाहीत. परिणामी वाहनांचा अपघात होण्याच्या घटना घडत आहे. यासाठी गतिरोधकाची मागणी होत आहे.
......................................................
अपुरा पाणीपुरवठा;
सातारकर झाले हैराण
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शहरातील पश्चिम भागात कास योजनेतून पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
सातारा शहराच्या पश्चिमेकडील काही भागात कास धरणातून पाणीपुरवठा होतो. बोगदा परिसर, धस कॉलनीसह काही भागात गेल्या काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ लागला आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत, तर अपार्टमेंटमध्ये पाण्याची टंचाई भासत आहे. परिणामी पाणी विकत घेऊन पुरविण्याची वेळ आली आहे. याबाबत संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.
...................................................
रस्त्यावरील व्हॉल्व्हचा धोका कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचे काही ठिकाणचे व्हॉल्व्ह रस्त्यावरच आहेत. त्यामुळे नागरिकांना कायम धोका आहे. सातारा शहराला विविध योजनांतून पाणीपुरवठा होतो. त्यासाठी शहरात जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणचे व्हॉल्व्ह रस्त्यातच आहेत. त्यामुळे रस्त्याने चालत जाणाऱ्या नागरिकांचा त्यामध्ये पाय पडल्यास दुखापतीचीही शक्यता आहे. तसेच शहरात नवीन येणाऱ्यांना याची कल्पनाही असत नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक बनलेले आहे.
......................................................
आवक वाढल्याने
भाज्या झाल्या स्वस्त
सातारा : सातारा बाजार समितीत पालेभाज्यांची आवक अधिक होत आहे. त्यामुळे भाज्या काही प्रमाणात स्वस्त झाल्या आहेत. तीन महिन्यांपूर्वी भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. मेथी, शेपू, कोथिंबीरची पेंडीही २० रुपयांच्या पुढे होती; पण सध्या भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्यातच लॉकडाऊन असल्यामुळे भाज्यांचे दरही कमी झाले आहेत. वांगी, टोमॅटो, दोडक्यावर दराचा परिणाम झाला आहे.
..........................................