कोरोनाचा शिरकाव वाढला तरी एसटीच्या फेऱ्या कायम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:29 AM2021-02-22T04:29:47+5:302021-02-22T04:29:47+5:30
सातारा : राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे सातारकरांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी ते घरात बसून नाहीत. त्यामुळे राज्य ...
सातारा : राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे सातारकरांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी ते घरात बसून नाहीत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगारात फारसा परिणाम झालेला नाही. एसटीच्या सर्व फेऱ्या नियमित सुरू आहेत. अजून तरी कोणत्याही मार्गावरील वाहतूक बंद केलेली नाही. त्यामुळे प्रवाशांचीही चांगली सोय होत आहे.
राज्यात गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर सर्वप्रथम सार्वजनिक वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची सर्वाधिक झळ एसटीला बसली. तेव्हापासून आठ महिने एसटीच्या फेऱ्या बंद होत्या. त्यामुळे एसटीला मोठा आर्थिक फटका बसला होता. दरम्यान, दिवाळीपूर्वी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर ती पुन्हा टप्प्याटप्याने सुरू करण्यात आली.
राज्यातील अकोला, अमरावती, मुंबई, पुणे या जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव पुन्हा वाढू लागला आहे. सातारा जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. मात्र, लॉकडाऊन सुरू झालेले नसल्याने सर्व व्यवहार नियमित सुरू आहेत. त्यामुळे सातारकरांचे सर्व व्यवहार सुरू आहेत. शनिवार, रविवारी आठवडा सुटी असतानाही सातारा मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची गर्दी काही अंशी दिसत होती.
२५०००
जिल्ह्यात एसटीने रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या
२२०००
लॉकडाऊन खुला केल्यानंतरची संख्या
२००००
एसटीने सध्या प्रवास करणाऱ्यांची संख्या
चौकट
ना मास्क, ना डिस्टन्सिंग
राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ लागली आहे. अनेक भागांत रुग्ण वाढत आहेत. कोरोना रोखण्यासाठी एसटी महामंडळातर्फे खबरदारी घेतली जात आहे. आगारातून एसटी बाहेर काढण्यापूर्वी डिप क्लिनिंग केली जाते. जनजागृतीसाठी एसटीवर ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ या आशयाचा फलक लावला आहे. तरीही एसटीने प्रवास करणारे असंख्य प्रवासी मास्कचा वापर योग्य पद्धतीने करीत नाहीत. सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी केली जात नाही. ही बाब एसटी प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे.
चौकट
स्वारगेट विना थांबा जैसे-थेच
सातारकरांचे पुण्याशी जवळचे संबंध आहेत. शाळा, महाविद्यालये, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने असंख्य सातारकर दररोज पुण्याला जात आहेत. त्यामुळे सातारा-स्वारगेट विनाथांबा सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पुण्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या डोकेदुखी वाढवणारी असली तरी पुण्यातील सर्व व्यवहार अजूनही नियमित आहेत. त्यामुळे स्वारगेट विना थांबा पूर्वीप्रमाणेच प्रतिसाद मिळत आहे.
चौकट :
मेढा-लोणार गाडी बंद
राज्य परिवहन महामंडळाच्या मेढा आगारातून दररोज लोणारला गाडी सुरू केली होती. दरम्यान, त्यातून म्हणावे तसे उत्पन्न मिळत नसल्याने पंधरा दिवसांपूर्वी ही गाडी बंद करण्यात आली. मात्र, त्याचा कोरोनाशी काहीही संबंध नाही.
पाचवी ते नववीचे वर्ग सुरू झाल्यानंतर एसटी महामंडळाने ग्रामीण भागातही एसटीच्या फेऱ्या वाढविल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची चांगलीच सोय होत आहे, तसेच ग्रामस्थांतून मागणी होईल त्या प्रमाणात एसटी सुरू करण्याबाबत सर्व आगार व्यवस्थापकांना सूचना करण्यात आल्या आहेत.
फोटो
राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा मध्यवर्ती बसस्थानकावर रविवारी प्रवाशांची बऱ्यापैकी गर्दी होती. (छाया : प्रशांत कोळी)