कृष्णाकाठाला कोरोनाचा विळखा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:09 AM2021-07-13T04:09:22+5:302021-07-13T04:09:22+5:30
कऱ्हाड तालुक्यात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यानंतर कोरोना रुग्णवाढीला सुरुवात झाली. रुग्णांची वाढ दीडशे ते दोनशेवरून तीनशे ते साडेतीनशेवर पोहचली. ...
कऱ्हाड तालुक्यात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यानंतर कोरोना रुग्णवाढीला सुरुवात झाली. रुग्णांची वाढ दीडशे ते दोनशेवरून तीनशे ते साडेतीनशेवर पोहचली. अजूनही रुग्णवाढ होतच असून यातून तालुक्याला सावरताना प्रशासनही हतबल झाल्याचे दिसत आहे. त्यातच गत आठवड्यापासून ग्रामीण भागात कोरोनाने वेगाने हातपाय पसरले आहेत.
कृष्णाकाठावरील गावात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून आठ गावात वीसपेक्षा अधिक रुग्णसंख्या आहे. या गावातील रुग्णसंख्या आणखी वाढण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. सध्याची रुग्णवाढीची आकडेवारी पाहता कृष्णाकाठावरील काही गावात रुग्णवाढीची भीती खरी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- चौकट
विभागातील गावनिहाय रुग्ण
रेठरे बुद्रूक : ८४
वडगांंव हवेली : ७२
कार्वे : ४१
शेणोली : ३३
शेरे : २९
गोंदी : २९
कोडोली : २६
गोळेश्वर : २०
जुळेवाडी : १०
शिवनगर : ९
- चौकट
चाचण्या अन् निकट सहवासितांचा शोध
वडगाव हवेली, रेठरे, कापील, गोळेश्वर, कार्वे, दुशेरे, कोडोली, गोंदी, शेरे गावांमधे रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने त्यांच्या निकट सहवासितांंचा शोध घेत चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे. त्यामुळे रुग्णवाढीत आणखी भर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रशासनासह स्थानिक ग्रामपंचायती, सदस्यांची रुग्णवाढ रोखण्यासाठी प्रचंड धावपळ सुरू आहे. रुग्णवाढ आटोक्यात ठेवताना प्रशासनाची पुरती दमछाक झाली आहे.
- चौकट
ग्रामस्थांचा गाफिलपणा नडतोय!
कृष्णाकाठावरील अनेक गावात रुग्ण वाढत असताना अजूनही काही गावात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसते. विनामास्क गप्पांचा फड रंगताना अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. काही ग्रामस्थ मास्क लावत आहेत. तर अनेकांचा मास्क हनुवटीवरच लटकताना दिसत आहे. हा गाफिलपणा नडल्याने रुग्णवाढीला हातभार लागत असल्याचे चित्र आहे.
- चौकट
कापीलमध्ये कडक निर्बंध
कापील गावात ६१ रुग्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतीने गांभिर्याने घेत प्रांताधिकारी यांना गावात कडक लॉकडाऊन करावे, अशी मागणी केली. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले असून अत्यावश्यक कामाशिवाय कोणालाही घराबाहेर पडून दिले जात नसल्याचे ग्रामपंचायत सदस्य नितीन ढापरे यांनी सांगितले.