बाप्पांच्या उत्सवावर यंदाही कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:45 AM2021-08-13T04:45:04+5:302021-08-13T04:45:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : गेल्यावर्षीप्रमाणे याहीवर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करणाऱ्या भक्तांचा हिरमोड झाला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : गेल्यावर्षीप्रमाणे याहीवर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करणाऱ्या भक्तांचा हिरमोड झाला आहे. मोठ्या गणेशमूर्तींना शासनाने अद्याप परवानगी न दिल्याने साताऱ्यातील कुंभारवाड्यात सहा इंच ते चार फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती साकारल्या जात आहेत. विशेष म्हणजे यंदा शाडू मातीच्या मूर्तींनाच अधिक मागणी आहे.
दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दहा दिवसांच्या कालावधीत गणेशभक्तांच्या आनंदाला पारावार उरत नाही; परंतु गेल्यावर्षी कोरोनाचे संक्रमण वाढले अन् गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा लागला. उत्सावावर व मूर्तीच्या उंचीवर निर्बंध घालण्यात आले. यंदा संक्रमण कमी होऊन परिस्थिती पूर्वीसारखी होईल, अशी आशा होती. मात्र, सध्यातरी कोरोना संक्रमण कमी झालेले नाही. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सवही निर्बंधांसह साजरा करावा लागणार आहे.
शासनाने सार्वजनिक गणेश मंडळांना चार फूट, तर घरगुती गणेशमूर्तींना दोन फूट उंचीची परवानगी दिली आहे. त्यामुळे साताऱ्यातील कुंभारवाड्यात यंदा मोठ्या गणेशमूर्ती साकारण्यात आलेल्या नाही. सहा इंच ते चार फुटांच्या गणेशमूर्ती बनविण्याची लगबग कुंभारवाड्यात पहायला मिळत आहे. यंदा शाडू मातीच्या मूर्तींना भाविकांमधून मागणी वाढली आहे. गणेशोत्सव सुरू होण्यासाठी आणखीन महिनाभर कालावधी आहे. मात्र, तत्पूर्वीच बाजारपेठेत गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल लागले आहेत. अनेकांनी महिनाभर अगोदरच कोणत्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करायची याचे नियोजनही केले आहे.
(चौकट)
असे आहेत दर...
शाडू मूर्ती
६ इंच ३०० रुपये
४ फूट १५,०००
प्लास्टिर ऑफ पॅरिस
६ इंच २५० रुपये
४ फूट १०,०००
(चौकट)
मंडळांकडून प्लास्टर ऑफ पॅरिसला मागणी
प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेली गणेशमूर्ती शाडू मातीच्या तुलनेत वजनाने हलकी असते. ती कुठेही सहज घेऊन जाता येते. चार फुटांच्या मूर्तीचे दरही शाडू मातीच्या मूर्ती पेक्षा कमी असतात. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून चार फुटांच्या व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींनाच मागणी आहे. काही मंडळांनी अधिक खर्च टाळण्यासाठी जुन्याच मूर्तींना रंगरंगोटी करण्यावरही भर दिला आहे.
(कोट)
कोरोनाचा फटका इतर उद्योग व्यवसायांना बसला तसाच आम्हा कारागिरांनाही बसला आहे. पूर्वी दोन हजाराची मूर्ती घेणारा व्यक्ती आज एक हजार रुपयांची मूर्ती घेतानाही विचार करत आहे. मागणी कमी झाल्याने कारागिरांची संख्याही आपसूक कमी झाली. पाऊस व पुराचा देखील कारागिरांना मोठा फटका बसला आहे. सार्वजनिक मंडळांकडून पीओपी, तर घरगुतीसाठी शाडू मूर्तींनाच अधिक मागणी आहे.
- पोपट कुंभार, कारागीर, बदामी विहीर सातारा.
फोटो : जावेद खान