खंडाळा तालुक्यात कोरोनाचे थैमान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:49 AM2021-04-30T04:49:59+5:302021-04-30T04:49:59+5:30

खंडाळा : तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या सहा हजारांच्या घरात पोहोचली आहे. तालुक्यात गेल्या पंधरा ...

Corona's Thaman in Khandala taluka! | खंडाळा तालुक्यात कोरोनाचे थैमान !

खंडाळा तालुक्यात कोरोनाचे थैमान !

Next

खंडाळा : तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या सहा हजारांच्या घरात पोहोचली आहे. तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या जवळपास १२५३ झाली आहे, तर तालुक्यात उपचारासाठी बेडची संख्या केवळ २८५ असल्याने नागरिकांची धावपळ होत आहे. त्यामुळे लोकांना सुविधा पुरविताना प्रशासनावर मोठा भार येत आहे.

शासनाने लॉकडाऊनचे नियम व निर्बंध कडक केले असले तरी लोकांचे वागणे बेजबाबदार असल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तालुक्यात अनेक कंपन्यांमध्ये येणारे कामगार कोरोनाची चाचणी खासगी लॅबमध्ये करीत आहेत. अनेकजण सोयीस्कर अहवाल घेत असल्याने ते इतर लोकांमध्ये वावरत असतात. त्यातीलच काही पॉझिटिव्ह झाल्यास त्याचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे कंपनी प्रशासनाने सरकारी तपासणी करणे गरजेचे आहे अथवा कंपनीने कामगारांची स्वतंत्र व्यवस्था करणे गरजेचे आहे.

खंडाळा तालुक्यात ६३ गावांमध्ये कोरोनाने हातपाय पसरले असून, कोरोना बाधितांची एकूण संख्या सहा हजारांवर पोहोचली आहे. तालुक्यात लोणंद येथील चार रुग्णालये, खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालय व मानसी हॉस्पिटल व शिरवळ येथील बालाजी हॉस्पिटलमध्ये उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, बेडसंख्या कमी असल्याने सध्या रुग्णांना बेड उपलब्ध होणे मुश्कील झाले आहे. शिरवळ, खंडाळा, लोणंदसह अंदोरी, खेड बुद्रुक, विंग या गावातून रुग्णसंख्या अधिक आढळल्याने स्वतंत्र विलगीकरण कक्ष बनविले आहेत. या ठिकाणची व्यवस्था करताना स्थानिक समितीला कसरत करावी लागत आहे. खंडाळा व लोणंद नगरपंचायत क्षेत्रात प्रशासनाने नियम काटेकोर करून मेडिकल सेवावगळता सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत. याशिवाय तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे पथक सर्वाधिक बाधित गावात जाऊन जनजागृती करीत आहेत. पोलीस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करणे सुरू केले आहे. तरीही लोकांनी स्वयंस्फूर्तीने नियम पाळणे बंधनकारक करायला हवे.

चाैकट..

व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता करणे गरजेचे...

तालुक्यात खासगी रुग्णालयातील काही व्हेंटिलेटर बेड सोडले तर इतर ठिकाणी ही सुविधा नाही, तर केवळ १६९ ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. खासगी रुग्णालयात उपचार घेणे सर्वसामान्य लोकांना शक्य नसल्यामुळे सरकारी कोविड केअर सेंटरची बेड संख्या वाढविणे तसेच तालुक्यात व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता करणे गरजेचे आहे.

(चौकट)

उपकेंद्रामध्ये आठवड्यातून एकदा लसीकरण...

तालुक्यात खंडाळा ग्रामीण रुग्णालय, शिरवळ, अहिरे, लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम सुरू आहे तर इतर उपकेंद्रामध्ये आठवड्यातून एकदा लसीकरण केले जाते. मात्र, लसीकरणाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात झाल्यास त्याचा वेग वाढविणे सहजशक्य आहे.

29खंडाळा

फोटो- खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

Web Title: Corona's Thaman in Khandala taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.