कोरोनाचा थयथयाट.. साताऱ्यात शुकशुकाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:38 AM2021-05-26T04:38:57+5:302021-05-26T04:38:57+5:30
सातारा : गेल्या दीड महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू असलेला कोरोनाचा कहर थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दि. २५ मे ते १ जून ...
सातारा : गेल्या दीड महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू असलेला कोरोनाचा कहर थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दि. २५ मे ते १ जून या कालावधीत संचारबंदीचे निर्बंध कठोर केले आहेत. या निर्बंधांची जिल्ह्यासह सातारा शहरात काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. नागरिकांसह वाहनधारक दिवसभर घराबाहेर न पडल्याने शहरातील प्रमुुख रस्ते व चौकात शुकशुकाट पसरला होता. पोलीस दलाकडूनही ठिकठिकाणी कडेकोड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सातारा जिल्ह्यात दीड महिन्यापासून कोरोनाबाधित व मृतांची संंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे राज्यात सातारा जिल्हा रेड झोनमध्ये आला आहे. संचारबंदी लागू करूनही कोरोनाची साखळी तुटण्याचे नाव घेत नसल्याने जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचे निर्बंध अधिक कठोर केले असून, दि. १ जूनपर्यंत सर्व अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची जिल्ह्यासह सातारा शहरात मंगळवारपासून काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली.
विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने मंगळवारी नागरिकांसह वाहनधारकांनी घराबाहेर पडण्याचे धाडस केले नाही. त्यामुळे नेहमीच गर्दीने गजबजणारा राजपथ, खणआळी, राजवाडा, चांदणी चौक, मोती चौक, पाचशे एक पाटी, पोवई नाका व बसस्थानक परिसरात नीरव शांतता पसरली होती. सातारा तालुक्यातील ग्रामीण भागातही दिवसभर शुकशुकाट जाणवला.
(चौकट)
दूध विक्रेत्यांची अडवणूक
संचारबंदीचे निर्बंध कठोर केले असले, तरी प्रशासनाने सकाळी ७ ते ९ या वेळेत घरपोच दूध विक्री करण्यात परवानगी दिली आहे. मंगळवारी सकाळी करंजे, बुधवार नाका येथे दूध विक्रीसाठी निघालेल्या अनेक दूध विक्रेत्यांना पोलिसांनी अडविले. पालिकेकडून देण्यात आलेला परवाना संबंधितांकडे नसल्याने त्यांना आल्यापावली माघारी जावे लागले.
(चौकट)
नियमांचे पालन करावे..
कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. संचारबंदीचे नागरिकांनी काटेकोर पालन करावे, कोणीही अनावश्यक कामासाठी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करतानाच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
फोटो : जावेद खान