शिंगणवाडी येथील कोरोनाबाधित महिलेचा बेड न मिळाल्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:42 AM2021-05-20T04:42:10+5:302021-05-20T04:42:10+5:30
चाफळ : पाटण तालुक्यातील चाफळ विभागातील शिंगणवाडी येथील कोरोनाबाधित महिलेस वेळेत बेड उपलब्ध न झाल्याने मंगळवारी आपला जीव गमवावा ...
चाफळ :
पाटण तालुक्यातील चाफळ विभागातील शिंगणवाडी येथील कोरोनाबाधित महिलेस वेळेत बेड उपलब्ध न झाल्याने मंगळवारी आपला जीव गमवावा लागला. या घटनेने संपूर्ण चाफळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. विभागातील १९ गावांत आतापर्यंत एकूण १३५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले असून, यातील ७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ९२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने ही विभागाच्या दृष्टीने जमेची बाजू ठरली आहे. विभागातील बाधितांचा आकडा व मृत्यूदर हा सर्वांनाच विचार करायला भाग पाडणारा ठरला आहे. आजही ३६ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
चाफळ विभागात कोरोनाने दुसऱ्या लाटेत हाहाकार माजवला आहे. मंगळवारी शिंगणवाडी येथील कोरोनाबाधित महिलेस वेळेत बेड उपलब्ध न झाल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. ही बाब गंभीर असून सर्वांना काळजी घेण्याबरोबरच विचार करायला भाग पाडणारी ठरली आहे. चाफळ विभागात एकूण प्रमुख २२ गावे आहेत. यापैकी १९ गावांत कोरोनाने शिरकाव केला आहे. तर उर्वरित खराडवाडी, नाणेगाव खुर्द व चव्हाणवाडी या तीन गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले आहे. या गावांनी राबवलेल्या उपाययोजना व घेतलेल्या खबरदारीचा आदर्श विभागातील इतर गावांनी घेणे गरजेचे आहे. विभागात पहिल्या लाटेच्या तुलनेत यावर्षी दुसऱ्या लाटेत अवघ्या ७० दिवसांत १३५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे, तर सध्या सुरू असलेल्या
या दुसऱ्या लाटेत वयोवृद्धांच्या तुलनेत तरुण वर्गास कोरोनाने लक्ष करत बाधित केल्याची नोंद चाफळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आहे. सुरुवातीला एखाद्या गावात कुठेतरी बाधित रुग्ण आढळून येत होता. मात्र, त्यानंतर गावागावात २२ च्या पटीत बाधित आढळून येत गावेच्या गावे बाधित होऊ लागली. यात तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला गेला. योग्य ती खबरदारी न घेणे, मास्कचा वापर व्यवस्थित न करणे, उनाडपणे फिरणे आदी कारणांमुळे दुसऱ्या लाटेत तब्बल १३५ जण बाधित आढळून आले. यातील ९२ बाधितांनी कोरोनावर मात केली असली तरी ७ जणांना वेळेत उपचार व ऑक्सिजन बेड उपलब्ध न झाल्याने मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. आजही विभागातील ३६ बाधितांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
विभागात बाधितांच्या तुलनेत बरे होणारांचे प्रमाण चांगले असल्याने ही बाब विभागाला दिलासादायक ठरली आहे. मात्र, उपचाराअभावी हकनाक बळी ठरलेल्या बाधितांचा आकडाही विचार करायला भाग पाडणारा ठरला आहे.
कोट :-
अजूनही कोरोना संपला नसून विभागातील प्रत्येक गावातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेतली तर कोरोनाला दूर करण्यास मदत होणार आहे. शासनाने लॉकडाऊन काळात घालून दिलेल्या नियमांचे पालन करत घरी थांबण्याचे आवाहन आरोग्य सेवक राजेंद्र राऊत यांनी केले आहे.
(२):- चाफळ विभागातील गावनिहाय बाधित व मृत्यू खालीलप्रमाणे.
(१):- चाफळ - २२ - ( मृत्यू - १ )
(२):-माजगाव - १८ - ( मृत्यू - १ )
(३):- गमेवाडी - ४
(४):- जाधववाडी - ६
(५):- वाघजाईवाडी - ३
(६):- डेरवण - ५
(७):- शिंगणवाडी - ४ - ( मृत्यू - १ )
(८):- दाढोली - ६
(९):- खोणोली -२
(१०):- कोचरेवाडी - ३
(११):- नाणेगाव बुद्रुक - ३
(१२):- जाळगेवाडी - १
(१३):- माथणेवाडी - २
(१४):- केळोली - १९ - ( मृत्यू- ३ )
(१५):- विरेवाडी - ४
(१६):- पाडळोशी - १
(१७):- धायटी - २९
(१८):- पाठवडे -१
(१९):- सडावाघापूर - २ - ( मृत्यू - १ )
* एकूण बाधित - १३५
* कोरोनावर मात केलेले रुग्ण - ९२
* मृत्यू - ७
* उपचार घेत असलेले रुग्ण - ३६