मलकापुरात कोरोनामुक्तिचा दर ९६.६ टक्क्यांवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:31 AM2021-01-04T04:31:11+5:302021-01-04T04:31:11+5:30
मलकापूर : गत पंधरा दिवसात मलकापुरात केवळ ४ जणच कोरोना बाधित आढळले आहेत. शहरात आत्तापर्यंत एकूण १ हजार ८६ ...
मलकापूर : गत पंधरा दिवसात मलकापुरात केवळ ४ जणच कोरोना बाधित आढळले आहेत. शहरात आत्तापर्यंत एकूण १ हजार ८६ बाधित झाले असून, त्यापैकी १ हजार ८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर ३४ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चार रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून, ‘होम आयसोलेशन’मध्ये कोणीही नाही. त्यामुळे मलकापुरात कोरोना मुक्तिचा दर वाढून ९६.६ टक्क्यांवर गेला आहे. शहराचा मृत्यूदर ३.१ टक्क्यावर स्थिर आहे, तर ०.३ टक्केच अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम प्रभाविपणे राबवल्यामुळे मलकापुरात गत दोन महिन्यात बाधितांचा आकडा झपाट्याने कमी होत आहे. तत्पूर्वी पहिल्या टप्प्यात एका महिन्यात शहरात ३१ रुग्ण झाले होते. पालिका, शासन व आरोग्य विभागाने कोरोना लढ्याचे योग्य नियोजन करून उपचार केल्याने एक महिन्यातच शहरातील सर्व ३१ रुग्ण बरे झाले होते. मात्र, एक महिन्याच्या विश्रांतीनंतर २६ जूनला पुन्हा दुसऱ्यांदा कोरोनाचा शिरकाव झाला आणि चार महिने टप्प्याटप्प्याने रुग्ण वाढतच गेले. ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यातच कोरोनाने कहर केला होता. दिवसाला २५ ते ३० जण बाधित येत होते. ऑक्टोबर महिन्यात सुरुवातीला दिवसाला १०-१२ जण, तर शेवटी केवळ ३ ते ४ रुग्ण सापडले.
नोव्हेंबर महिन्यात दिवसाला सरासरी २ ते ३ जण बाधित येत होते, तर डिसेंबर महिन्यात केवळ १८ जणच बाधित सापडल्याने दिवसाला एकही सापडला नाही. या महिन्यात काहीवेळेला आठ-आठ दिवस एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. याबरोबरच या महिन्यात एकही मृत्यू झाला नाही. शहरात हळूहळू संख्या कमी झाली असली तरी बाधित होण्याचे थांबले नसल्याने काळजी घेणे गरजेचे आहे.
- चौकट
... असे वाढले रुग्ण
१) २२ एप्रिल ते २४ मे : ३१
२) २५ मे ते २५ जून : ०
३) २६ जून ते २६ जुलै : ४३
४) २७ जुलै ते २६ ऑगस्ट : ३३८
५) २७ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर : ४२८
६) २७ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर : १५९
७) २८ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर : ६९
८) २८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर : १८
- चौकट
मलकापूर लेखाजोखा
एकूण : १०८६
मृत्यू : ३५
डिस्चार्ज : १०५१
उपचारार्थ : ४
आयसोलेट : ०
फोटो : ०३केआरडी०५
कॅप्शन : मलकापूर येथे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी अद्यापही संशयित रुग्णांच्या स्वॅबचे नमुने घेतले जात आहेत.