CoronaVirus : जिल्ह्यात बळींचा आकडा २९, एकाचा मृत्यू तर एक पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 02:54 PM2020-06-11T14:54:59+5:302020-06-11T14:56:26+5:30
सातारा जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गुरुवारी आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला तर एकजण कोरोना बाधित आढळून आला. तसेच महाबळेश्वर येथील कुरोशी या गावात विलगीकरण केलेल्या व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या ६९० वर तर बळींचा आकडा २९ झाला आहे.
सातारा : जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गुरुवारी आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला तर एकजण कोरोना बाधित आढळून आला. तसेच महाबळेश्वर येथील कुरोशी या गावात विलगीकरण केलेल्या व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या ६९० वर तर बळींचा आकडा २९ झाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, गुरुवारी गिघेवाडी, ता. कोरेगाव येथील ७८ वर्षीय कोरोना बाधित वृद्धाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब व श्वसन संस्थेचा त्रास होता. तसेच साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल असणाºया कोल्हापूर येथील ३९ वर्षीय व्यक्तीचा अहवालही कोरोना बाधित आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बाधितांचा आकडा आता ६९० वर पोहोचला आहे.
दोन बाधित स्त्रियांची प्रसुती; बाळं लक्षणे विरहित
जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल असणाऱ्या जावळी तालुक्यातील गावडी येथील कोरोना बाधित २६ वर्षीय महिलेची ३० मे रोजी प्रसूती झाली असून बाळ व आई सुखरुप आहेत. या बाळाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. गुरूवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तसेच माण तालुक्यातील बनवडी येथील कोरोना बाधित २५ वर्षीय महिलेची १० जून रोजी सकाळी सुरक्षित प्रसुती झाली. बाळ व आई सुखरुप असून बाळ लक्षणे विरहित आहे.
विलगीकरणातून बाहेर जाऊन आत्महत्या
महाबळेश्वर येथील कुरोशी येथील ५५ वर्षीय व्यक्ती सपत्नीक मुंबईवरून गावी आली होती. या गावात त्यांच्या भावाचे छोटे हॉटेल असून, या ठिकाणी त्यांना विलगीकरणात ठेवले होते. गुरुवारी पहाटे पत्नी झोपेत असतानाच संबंधित व्यक्तीने बाहेर जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह बेल एअर हॉस्पीटलमध्ये नेऊन त्यांच्या स्त्रावाचे नमुने घेण्यात आले. दरम्यान, या व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे सांगण्यात आले होते.