CoronaVirus : जिल्ह्यात आणखी एकाचा कोरोनामुळे बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 01:30 PM2020-05-28T13:30:37+5:302020-05-28T13:32:29+5:30
सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाची भीषणता वाढत असून, कऱ्हाड येथील मलकापूरमधील एका ४७ वर्षीय कोराना बाधित व्यक्तीचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. तर दुसरीकडे तब्बल २३० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला. जिल्ह्यात कोरोनामुळे बळींची संख्या आता १५ वर पोहोचली असून, बाधित रुग्णांची संख्या ४२२ झाली आहे.
सातारा : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाची भीषणता वाढत असून, कऱ्हाड येथील मलकापूरमधील एका ४७ वर्षीय कोराना बाधित व्यक्तीचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. तर दुसरीकडे तब्बल २३० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला. जिल्ह्यात कोरोनामुळे बळींची संख्या आता १५ वर पोहोचली असून, बाधित रुग्णांची संख्या ४२२ झाली आहे.
जिल्ह्यात बुधवारी एकाच दिवशी सहाजणांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. बाधित रुग्णांबरोबरच रुग्णांच्या मृत्यूचेही प्रमाण वाढत असल्याने सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे.
कऱ्हाडतालुक्यातील मलकापूर येथील स्वत:च्या मालकीच्या घरात राहणारा व मूळ पाटण तालुक्यातील बाचोलीतील रहिवाशी असलेल्या ४७ वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला.
ही व्यक्ती पनवेल येथून प्रवास करून आली होती. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने दि. २१ रोजी त्यांना कऱ्हाडमधील कृष्णा मेडीकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले होते. या रुग्णाला सुरूवातीपासून उच्च रक्तदाबाचा त्रासही होता, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
दरम्यान, एकीकडे रुग्णांच्या बळींचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे प्रशासन चिंतेत असतानाच दुसरीकडे मात्र, कोरोना संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह येण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे धाकधूक कमी होत आहे.
गुरूवारी सकाळी तब्बल २३० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामध्ये पुणे येथून १९१ तर कृष्णा मेडिकल कॉलेज, कºहाड येथून ३९ अशा २३० जणांचा समावेश आहे. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील २७ जणांच्या घशातील स्त्रवांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत ४२२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, यापैकी १२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या २८१ कोरोना बाधित रुग्णांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरु आहेत.