CoronaVirus : जिल्हा पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 01:42 PM2020-06-02T13:42:35+5:302020-06-02T13:44:49+5:30
सातारा जिल्हा पोलीस दलातही आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ऐका पोलीस उपनिरीक्षकालाच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यामुळे पोलीस दलात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिरवळ : सातारा जिल्हा पोलीस दलातही आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ऐका पोलीस उपनिरीक्षकालाच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यामुळे पोलीस दलात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेली प्राथमिक अशी की, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सातारा-पुणे जिल्ह्याच्या सीमेवर सातारा जिल्हा प्रशासनामार्फत तपासणी नाका निर्माण करण्यात आला आहे. याठिकाणी सातारा येथील मुख्यालयातील अधिकारी, राखीव पोलीस दल तसेच शिरवळ पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी नाक्यावर कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची दि.२६ मेपासून आरोग्य तपासणी केली. तर ३१ मे रोजी घशातील स्त्राव घेण्यात आले होते.
सोमवारी रात्री उशिरा संबंधितांचे तपासणी अहवाल आल्यानंतर याठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या ३० वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यामुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
सातारा जिल्हा पोलीस दलात पहिलाच कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पोलीस उपनिरक्षकांच्या सानिध्यात आलेल्यांची माहिती घेण्याचे काम प्रशासनाकडून काम सुरु आहे. संबंधितांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक कोरोना बाधित झाल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील तपासणी नाक्याला व शिरवळ पोलीस स्टेशनला भेट देऊन पाहणी केली. तसेच विविध सूचना केल्या.
दरम्यान, धनगरवाडी ता. खंडाळा येथील ७२ वर्षीय महिला व एक पोलीस उपनिरीक्षक कोरोना बाधित झाल्याने खंडाळा तालुक्यातील आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत झाली आहे.