CoronaVirus : ई-पाससाठी पैसे उकळणाऱ्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 04:14 PM2020-06-04T16:14:39+5:302020-06-04T16:16:42+5:30
लॉकडाउनमध्ये बाहेरगावी जाण्यासाठी सातारा पोलिसांचा आवश्यक असलेला पास मिळवून देण्याच्या नावाखाली तीनशे रुपये उकळल्याप्रकरणी सातारा शहरातील सोमवार पेठेतील महालक्ष्मी आॅनलाईन सेवा या दुकानातील एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : लॉकडाउनमध्ये बाहेरगावी जाण्यासाठी सातारा पोलिसांचा आवश्यक असलेला पास मिळवून देण्याच्या नावाखाली तीनशे रुपये उकळल्याप्रकरणी सातारा शहरातील सोमवार पेठेतील महालक्ष्मी आॅनलाईन सेवा या दुकानातील एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, महेश चंद्रकांत साळुंखे (रा. सदाशीव पेठ, सातारा) यांच्या मुलीला सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथून साताऱ्यात यायचे होते. त्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यासाठी त्यांनी शहरातील सोमवार पेठेतील आकांक्षा कॉर्नर येथे असलेल्या महालक्ष्मी ई-सेवा केंद्रातून जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर अर्ज केला होता.
मात्र, तो अर्ज भरून देण्यासाठी कोणतेही शुल्क न घेण्याबाबत जिल्हाधिकारी सातारा यांनी आदेश दिलेले असतानाही संबंधित सेवा केंद्रातील एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याकडून तीनशे रुपये घेतले.
तसेच त्यांचा अर्ज चुकीच्या पद्धतीने भरला. त्यामुळे त्यांच्या मुलीला साताऱ्यात येण्यास परवानगी मिळाली नसल्याने त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात संबंधित केंद्रातील अनोळखी व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.