CoronaVirus InSatara : सकाळी दिलासा..सायंकाळी चिंता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 12:48 PM2020-05-25T12:48:14+5:302020-05-25T12:50:35+5:30
कोरोनाची बातमी सकाळी नेमकी काय येईल, याची सर्वांना रोज हुरहुर लागते. सोमवारची सकाळ मात्र, दिलासादायक ठरली. तब्बल १७१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाबरोबरच सातारकरांनीही सुटकेचा निश्वास टाकला.
सातारा : कोरोनाची बातमी सकाळी नेमकी काय येईल, याची सर्वांना रोज हुरहुर लागते. सोमवारची सकाळ मात्र, दिलासादायक ठरली. तब्बल १७१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाबरोबरच सातारकरांनीही सुटकेचा निश्वास टाकला.
जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा आकडा एक-एक करत कधी तीनशे पार झाला, हे कोणालाही कळले नाही. रोज सायंकाळी आणि रात्री अचानक कोरोना बाधितांची संख्या वाढल्याचे आकडे समोर येतायत. त्यामुळे सर्वांनाच धडकी भरतेय.
तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल रोज सकाळी निगेटिव्ह की, पॉझिटिव्ह येतायत, याची प्रशासनाबरोबरच सातारकरांनाही चिंता लागतेय. सोमवारी सकाळी एकूण १७१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. एवढ्या मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह अहवाल आल्याने सोशल मीडियावरही अनेकांनी आनंद व्यक्त केला. प्रशासनाकडून रोज येणाऱ्या अहवालाकडे सर्वांचेच बारकाईने लक्ष आहे.
कऱ्हाड येथील कृष्णा मेडीकल कॉलेज येथे दाखल असणाऱ्या २४ वर्षीय कोरोना बाधित महिलेची शस्त्रक्रियेद्वारे सुरक्षित प्रसूती करण्यात आली. आई व बाळ दोघेही सुखरुप आहेत. तसेच सोमवारी पहाटे साडेतीन वाजता कंटेन्मेंट झोन असलेल्या भिमनगर, कोरेगाव येथील २२ वर्षीय महिलेची सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली.
आई व बाळ दोघेही सुरक्षित असून आईच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
दरम्यान, कऱ्हाड येथील कृष्णा मेडिकल कॉलेज येथील ४६, जिल्हा शासकीय रुग्णालयत ८ अशा एकूण ५४ जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्च चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.