CoronaVirus InSatara: जिल्ह्यात एका कोरोना बाधितासह तीन संशयितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 06:26 PM2020-05-22T18:26:09+5:302020-05-22T18:28:19+5:30
सातारा जिल्ह्यात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले असून, शुक्रवारी एकाच दिवशी एका कोरोना बाधितासह तीन संशयितांचा बळी गेला.
सातारा : जिल्ह्यात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले असून, शुक्रवारी एकाच दिवशी एका कोरोना बाधितासह तीन संशयितांचा बळी गेला. यामध्ये जावळी तालुक्यातील एका कोरोना बाधिताचा समावेश आहे. उर्वरित मृत्यू झालेल्या तीन कोरोना संशयितांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे समोर येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे पाचजण मृत्यू पावले असून, २०१ रुग्ण कोरोना बाधित आहेत.
जावळी तालुक्यातील वरोशी येथील ५८ वर्षीय कोरोना बाधित रुग्णावर कºहाड येथील कृष्णा मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरू होते. या रुग्णाचा शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रुग्णाला मधुमेह व श्वसनसंस्थेचा तीव्र आजार झाला होता.
तसेच वरळी मुंबई येथून प्रवास करून आलेली पाचगणी येथील ६४ वर्षीय महिला गृह विलगीकरण कक्षात दाखल होती. या महिलेचाही मृत्यू झाला. या महिलेचा मृत्यू दम्याच्या आजाराने व हृदविकाराने झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
कऱ्हाड तालुक्यातील नांदलापूर येथील ६० वर्षीय महिलेचा कृष्णा मेडिकल कॉलेज येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचबरोबर घाटकोपर, मुंबई येथून प्रवास करून आलेल्या दोन महिन्याच्या बालकाला श्वास घेण्यास त्रास होत होता म्हणून दाखल करण्यात आले होते. या दोन महिन्यांच्या बालकाचाही शुक्रवारी मृत्यू झाला.
मृत्यू झालेल्या तीन कोरोना संशयितांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या तिघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे, हे स्पष्ट होणार आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालय, सातारा येथे २२, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कऱ्हाड येथे ८७ अशा एकूण १०९ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
१४६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय सातारा ३४, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कऱ्हाड येथील ५३, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील ९, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील १५, कृष्णा मेडिकल कॉलेज, कऱ्हाड येथील ३५ अशा एकूण १४६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तींची संख्या २०१ झाली असून, कोरोनामुक्त होऊन १०६ जण घरी गेले आहेत. तर पाचजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ९० कोरोना बाधितांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.