CoronaVirus News in Satara: ‘कृष्णा’च्या रोगनिदान प्रयोगशाळेला ‘कोविड-19’च्या टेस्ट करण्यास मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 10:00 AM2020-05-02T10:00:54+5:302020-05-02T10:01:09+5:30
CoronaVirus Marathi News Updates in Satara: आता कराडमध्येच होणार कोरोना चाचणी; सातारा जिल्यातील एकमेव प्रयोगशाळा
कराड : ‘कोविड-19’ची चाचणी करण्यास येथील कृष्णा हॉस्पिटलच्या रोगनिदान प्रयोगशाळेला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता कराडमध्येच ‘कोविड-19’च्या चाचण्या होणार असून, रूग्णांचे रिपोर्ट लवकर मिळणे शक्य होणार आहे. ‘कोविड-19’ चाचणीसाठीची सातारा जिल्ह्यातील ही एकमेव प्रयोगशाळा आहे.
कोरोना साथीचा सामना करण्यासाठी कृष्णा हॉस्पिटलने पूर्वीपासूनच पुढाकार घेऊन काम सुरू केले. हॉस्पिटलमध्ये संशयित रूग्ण आणि पॉझिटिव्ह रूग्णांसाठी स्वतंत्र वॉर्डची निर्मिती, तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्स व अन्य स्टाफ आणि कोरोना बाधित रूग्णांची घेतली जाणारी विशेष काळजी यामुळे कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रूग्णांमध्ये बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून कोरोनामुक्त झालेल्या 4 पेशंटना डिस्चार्ज देण्यात आला असून, यामध्ये 10 महिन्याच्या बालकाचा आणि 78 वर्षीय वृद्धेचा समावेश आहे.
सातारा जिल्ह्यात ‘कोविड-19’ची चाचणी करण्याची सोय उपलब्ध नसल्याने संशयित रूग्णांचे स्वॅब पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठविले जायचे. या प्रयोगशाळेवर मोठा ताण असल्याने किमान दोन दिवसानंतर रिपोर्ट उपलब्ध होत होते. त्यामुळे कराड येथील कृष्णा हॉस्पिटलच्या रोगनिदान प्रयोगशाळेस ‘कोविड-19’ची चाचणी करण्यास मान्यता मिळावी, यासाठी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले सुरवातीपासून आग्रही होते.
त्यानुसार कृष्णा हॉस्पिटल प्रशासनाने गेल्या महिन्याभरापासून नवी दिल्ली येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानकडे पाठपुरावा सुरू केला होता. तसेच हॉस्पिटल प्रशासनाने 9 एप्रिल 2020 रोजी याबाबत पत्रव्यवहारही केला होता. कृष्णा हॉस्पिटलची रोगनिदान प्रयोगशाळा एन.ए.बी.एल. मानांकीत असून, याठिकाणी ‘कोविड-19’ ची चाचणी करण्यास आवश्यक ती सर्व अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि तज्ज्ञ स्टाफ असल्याने या प्रयोगशाळेला ‘कोविड-19’ची चाचणी करण्याची परवानगी देत असल्याचे पत्र अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानने हॉस्पिटल प्रशासनास पाठविले आहे.
याबाबतची योग्य ती तांत्रिक पूर्तता झाल्यानंतर लवकरच या चाचण्यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलच्या रोगनिदान प्रयोगशाळेत प्रारंभ केला जाणार असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.