CoronaVirus Lockdown :जिल्ह्यात ११ आमदार, ३ खासदार, राजकीय इच्छाशक्ती वाढविण्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 05:28 PM2020-05-12T17:28:59+5:302020-05-12T17:34:17+5:30

जिल्ह्यातील मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर झालेल्या बदलानुसार अनेकांचे मतदारसंघ उडाले. काही नव्याने तयार झाल्याने त्याठिकाणी ताकद लावाली लागली. जिल्ह्यात दहाचे आठ आमदार झाले आणि दोनाचे एक खासदार झाले. पण जिल्ह्याचे राजकीय नशीब पालटले आणि आठचे अकरा आमदार आणि एकाचे तीन खासदार झाले.

CoronaVirus Lockdown: 11 MLAs, 3 MPs, need to increase political will in the district | CoronaVirus Lockdown :जिल्ह्यात ११ आमदार, ३ खासदार, राजकीय इच्छाशक्ती वाढविण्याची आवश्यकता

CoronaVirus Lockdown :जिल्ह्यात ११ आमदार, ३ खासदार, राजकीय इच्छाशक्ती वाढविण्याची आवश्यकता

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात ११ आमदार, ३ खासदार, राजकीय इच्छाशक्ती वाढविण्याची आवश्यकताजिल्ह्याची राजकीय ताकद वाढल्याने विकासाला जोर

दीपक शिंदे

सातारा : जिल्ह्यातील मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर झालेल्या बदलानुसार अनेकांचे मतदारसंघ उडाले. काही नव्याने तयार झाल्याने त्याठिकाणी ताकद लावाली लागली. जिल्ह्यात दहाचे आठ आमदार झाले आणि दोनाचे एक खासदार झाले. पण जिल्ह्याचे राजकीय नशीब पालटले आणि आठचे अकरा आमदार आणि एकाचे तीन खासदार झाले.

राज्यसभेसाठी खासदार उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेसाठी आमदार शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून १ खासदार आणि १ आमदार अधिक मिळाला. रामराजे नाईक निंबाळकर आणि महादेव जानकर यांच्यामुळे अकरा आमदार आणि तीन खासदार अशी राजकीय ताकद वाढलेलीय. या नेत्यांच्या राजकीय ताकदीचा जिल्ह्याच्या विकासासाठी नक्कीच फायदा होईल.


सातारा जिल्ह्यात मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर अनेक बदल झाले. एका मतदारसंघात दोन मतदारसंघ विलीन झाले आणि अनेक वर्षे मतदारसंघ राखून ठेवलेल्या नेत्याचे कसब पणाला लागले. या पुनर्रचनेनुसार जिल्ह्यात आमदारकीसाठी आठ मतदारसंघ आणि खासदारकीचा एक मतदारसंघ झाला.

सातारा-जावळी, वाई-महाबळेश्वर - खंडाळा, माण-खटाव, फलटण, कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर, पाटण आणि कोरेगाव असे आठ मतदारसंघ तयार झाले. तर सातारा आणि कऱ्हाड मिळून खासदारकीचा एकच मतदारसंघ तयार झाला. त्यामुळे अनेकांची राजकीय कोंडी झाली. आपल्या विभागात प्रभाव असला तरी दुसऱ्या उमेदवाराच्या मतदारसंघात जाऊन ताकद लावावी लागली.


मतदारसंघाच्या पुनर्रचनेतच शशिकांत शिंदे यांचे घोडे जावळीत अडले. माथाडी कामगारांचे प्रतिनिधीत्व करणारे शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने जावळीतून उमेदवारी दिली आणि सलग दोनवेळा तेथून ते निवडूनही आले. हा मतदारसंघ सातारा आणि जावळी या भागात विभागला गेला आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासाठी शशिकांत शिंदे यांना हा मतदारसंघ सोडावा लागला. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने शशिकांत शिंदे यांची कोरेगावमध्ये व्यवस्था केली.

साताऱ्यातून शिवेंद्रसिंहराजेंनी शशिकांत शिंदेंना मदत करायची आणि जावळीत शशिकांत शिंदेंनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मदत करायची, असा अलिखित समझोता झाला. गत निवडणुकीत सर्वच राजकीय गणिते फिरली. शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये गेले आणि शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच थांबले. त्यांनाही भाजपचे आवतन होतेच, दबावही होता. पण, शरद पवार यांच्यावरील निष्ठा आणि प्रेमापोटी त्यांनी राष्ट्रवादी सोडली नाही.

खासदार उदयनराजे भोसले हे देखील राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात असताना शशिकांत शिंदे यांनी सर्व आमदारांचा रोष ओढावून त्यांना मदत केली. पण, शशिकांत शिंदे यांच्या विधानसभा निवडणुकीला खासदार उदयनराजेंची मदत युतीचे उमेदवार महेश शिंदे यांना झाली. इथेच अडचण झाली आणि सहा हजार मतांनी शशिकांत शिंदेंचा पराभव झाला.


राष्ट्रवादी काँग्रेसची साताऱ्यातील प्रचाराची सुरुवात असो अगर शेवटची पावसातील सभा. यामध्ये शशिकांत शिंदे यांचे संघटन कौशल्य पाहायला मिळाले. राज्यात आणि जिल्ह्यातही राष्ट्रवादीला यश मिळाले; पण शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्याने शरद पवार यांनी साताऱ्यात विजयी सभा घेण्याचा निर्णय बदलला. एवढा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला.

राष्ट्रवादीच्या या निष्ठेचे फळ त्यांना मिळणारच होते. ते विधान परिषदेच्या सदस्याच्या रुपाने मिळाले. पुढे मंत्रिपदही मिळेल. कारण, पक्ष वाढीसाठी धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांना जपण्याची शरद पवार यांची पद्धत आहे. विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर आणि महादेव जानकर यांच्या माध्यमातून आणखी दोन आमदार वाढल्याने जिल्ह्यातील आमदारांचे संख्या अकरा झाली आहे. त्यामुळे पुनर्रचनेनंतरही जिल्ह्याची राजकीय ताकद वाढली आहे.


आत्तापर्यंत राजकीय ताकदीमध्ये सांगली जिल्हा अव्वल ठरत होता. या जिल्ह्यामध्ये तीन-तीन मंत्रिपदे दिली जात होती. त्याबरोबरच आता सातारा जिल्ह्याचेही राजकीय वजन वाढत आहे. सध्या जिल्ह्याच्या वाट्याला सहकारमंत्री आणि गृहराज्यमंत्री असे एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद आहे.

शशिकांत शिंदेंच्या माध्यमातून आणखी एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तसेच खासदार उदयनराजे भोसले यांनीही जरा जोर लावला तर त्यांनाही केंद्रातील मंत्रिपद मिळू शकते. असे झाले तर नक्कीच जिल्ह्याची राजकीय ताकद वाढून त्याची जिल्ह्याच्या विकासाला मदत होणार आहे.

उदयराजेंचा तह...रणजितसिंहांची लॉटरी...राष्ट्रवादीने राखली जागा

खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये जाताना भाजपशीही अलिखित तहच केला होता. दगा फटका होऊन जर खासदारकीच्या निवडणुकीत पराभव झाला तर राज्यसभेवर खासदार म्हणून घेतले जावे, असे ठरले होते. भाजपने हा शब्द पाळला आणि उदयनराजे भोसले यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली. माढा मतदारसंघातही राजकीय उलथापालथ झाली आणि शरद पवार यांना स्वत:ला हा मतदारसंघ सोडावा लागला. भाजपने त्याठिकाणी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली आणि या मतदारसंघातून ते निवडून आले.

जिल्ह्याला त्यांच्या रुपाने आणखी एक खासदार मिळाला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने सातारा मतदारसंघ राखण्यात यश मिळविल्याने खासदार श्रीनिवास पाटील, माढ्याच्या रुपाने खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि राज्यसभेच्या माध्यमातून खासदार उदयनराजे भोसले असे तीन खासदार जिल्ह्याला मिळाले.







 

Web Title: CoronaVirus Lockdown: 11 MLAs, 3 MPs, need to increase political will in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.