CoronaVirus Lockdown :जिल्ह्यातील २६ स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 05:55 PM2020-05-13T17:55:48+5:302020-05-13T17:58:00+5:30
सातारा जिल्ह्यात एकूण १,६७९ स्वस्त धान्य दुकाने आहेत. तसेच विविध स्वरुपाच्या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा कार्यालयाने जिल्ह्यातील २६ स्वस्त धान्य दुकांनावर कारवाई करून ११ दुकानदारांचे परवाने रद्द केले. ६ दुकानदारांचे परवाने निलंबित केले तर ३ दुकानांची संपूर्ण अनामत रक्कम जप्त केली आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यात एकूण १,६७९ स्वस्त धान्य दुकाने आहेत. तसेच विविध स्वरुपाच्या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा कार्यालयाने जिल्ह्यातील २६ स्वस्त धान्य दुकांनावर कारवाई करून ११ दुकानदारांचे परवाने रद्द केले. ६ दुकानदारांचे परवाने निलंबित केले तर ३ दुकानांची संपूर्ण अनामत रक्कम जप्त केली आहे.
६ दुकानदारांकडून धान्याच्या गैरव्यवहाराची बाजारभावाने भरपाई वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर उर्वरित काही दुकानदारांना गैरप्रकारांबाबत नोटीस देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली आहे.
यामध्ये लाभार्थ्यांना विहित परिणामापेक्षा कमी धान्य देणे, जादा दर आकारणे, काही दुकानदारांनी ग्राहक यादीमध्ये नाव असतानाही धान्य देण्यास नकार दिला आहे. अंत्योदय व प्राधान्य कार्डवरील आॅनलाईन नोंद असणाऱ्या व्यक्ती संख्येपेक्षा कमी सदस्यांचे धान्य वितरण केल्याची प्रकरणेही पुढे आलेली आहेत.
तसेच विक्री साठा लेखी प्रत्यक्ष विक्री केलेल्या धान्याशी न जुळणे, दर्शनी भागात भावफलक व प्राप्त धान्य माहिती न लावणे, उद्धट वर्तणूक करणे, ग्राहक रजिस्टर अद्ययावत न ठेवणे, लाभार्थ्यांना पावत्या न देणे आदीबाबत पुरवठा विभागाकडील भरारी पथकामार्फत तपासणीच्यावेळी गैरप्रकार निर्दशनास आले आहेत.
संवेदनशीलपणे व जबाबदारीने काम न करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदार यांच्यावर यापुढेही कार्यवाही सुरूच राहणार आहे, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी सांगितले आहे.