CoronaVirus Lockdown : वीटभट्टी कामगारांना घरी जाण्याची परवानी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 11:31 AM2020-04-22T11:31:06+5:302020-04-22T11:33:11+5:30
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन केले आहे. यासाठी वीट व्यवसायही बंद ठेवला आहे. त्यामुळे कामगार बसूनच आहेत. संपूर्ण राज्यामध्ये विखुरलेल्या वीटभट्टी कामगारांनाही ऊसतोड कामगारांप्रमाणे घरी जाण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे प्रदेशाध्यक्ष शाम राजे यांनी केली आहे.
मायणी : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन केले आहे. यासाठी वीट व्यवसायही बंद ठेवला आहे. त्यामुळे कामगार बसूनच आहेत. संपूर्ण राज्यामध्ये विखुरलेल्या वीटभट्टी कामगारांनाही ऊसतोड कामगारांप्रमाणे घरी जाण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे प्रदेशाध्यक्ष शाम राजे यांनी केली आहे.
शाम राजे म्हणाले, ह्यराज्यामध्ये कुंभार समाजाचा मुख्य व्यवसाय वीटभट्टी आहे. भट्टी व्यवसायासाठी आवश्यक असणारे कामगार जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकातून येत असतात. दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये पाण्याची कमतरता व मातीच्या अभावामुळे दरवर्षीचा व्यवसाय एप्रिल महिन्यामध्ये अनेक वीट व्यावसायिक वीट थापणी बंद ठेवत असतात.
शासनामार्फत कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण वीट व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून हे वीटभट्टी कामगार बसून आहेत. त्यांच्या हाताला कोणत्याही प्रकारचे काम नाही तसेच यावर्षीचा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या पाच ते सहा महिने चालणारा हा उद्योग असल्याने हे कामगार दरवर्षी एप्रिल महिन्यांमध्येच आपल्या घरी परतत असतात.
यंदा मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने शासनामार्फत संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांमध्ये जिल्हाबंदीचे आदेश काढल्यामुळे हे वीटभट्टी कामगार आपापल्या ठिकाणी कामाविना थांबून आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीनुसार राज्य शासनाने ऊसतोड कामगारांना घरी जाण्याची परवानगी दिली.
शासनाने ऊसतोड कामगारांप्रमाणे या वीटभट्टी कामगारांना घरी जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालयांमध्ये ई-मेलद्वारे करण्यात आली आहे.
शासनाने कुंभार समाजाच्या या मागणीचा सकारात्मक विचार करून गेल्या महिन्यापासून बसून असलेल्या व यावर्षी हंगाम संपूनही वीटकाम थांबलेल्या या वीटभट्टी कामगारांना आपल्या जिल्ह्यामध्ये व राज्यांमध्ये परत जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शाम राजे यांनी केली.