CoronaVirus Lockdown : कोरोनाचा इंधन विक्रीला फटका, शहरात केवळ दहा टक्के विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 12:24 PM2020-04-25T12:24:11+5:302020-04-25T12:27:22+5:30
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. इंधन विक्रीवर याचा प्रतिकूल परिणाम झाला असून, शहरातील पेट्रोल पंपांवरील इंधन विक्रीचा खप तब्बल दहा टक्क्यांवर घसरलेला आहे.
सातारा : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. इंधन विक्रीवर याचा प्रतिकूल परिणाम झाला असून, शहरातील पेट्रोल पंपांवरील इंधन विक्रीचा खप तब्बल दहा टक्क्यांवर घसरलेला आहे.
अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच इंधन पुरवठा करण्याचे निर्देश असल्याने पेट्रोल पंपावरील इंधन विक्री दहा टक्क्यांवर घसरली आहे. सातारा शहरात व उपनगरात मिळून १५ पेट्रोल पंप आहेत. या पंपांवरील इंधन विक्री रोज सरासरी तीन लाख लिटर होत असते. सध्या केवळ तीस हजार लिटर इंधन विक्री होत आहे.
पेट्रोल पंप चालकांना इंधन विक्रीत झालेल्या घटीमुळे मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. या व्यवसायावर तब्बल तीनशे कुटुंबे अवलंबून आहेत. या कामगारांचा पगार, प्रॉव्हिडंट फंड, एसआयएससी अशा धोरणात्मक बाबी पंप चालकांना सांभाळाव्या लागतात.
याव्यतिरिक्त इंधन खरेदीसाठी तसेच पेट्रोल पंपावर इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी पंपचालकांनी बँकांची कर्जे उचललेली आहेत. कर्जाचे व्याज वाढत असल्याने पंप चालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. बाहेर कसे पडायचा हा विचार सुरू आहे.
शहरातील पेट्रोल पंपावर सुरक्षेसाठी महिला पोलीस मोठ्या प्रमाणावर नेण्यात आले आहेत. हे कर्मचारी परिस्थिती बघून निर्णय घेतात. शहरातील एका पेट्रोल पंपावर दवाखान्यात जाण्यासाठी एक व्यक्ती दुचाकी वाहन घेऊन आली होती.
पंपावरील कर्मचाऱ्यांनी तुम्हाला पेट्रोल देता येणार नाही, असे स्पष्ट केले; परंतु दवाखान्यात असल्याने मला माझ्या गाडीत पेट्रोल मिळावे, अशी विनंती त्याने या पोलीस कर्मचाऱ्यांकडे केली, त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पेट्रोल देण्याच्या सूचना केल्या.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना फेब्रुवारी महिन्यापासूनच इंधन खपात मोठी घट झाली. व्यवसाय करत असताना बँकेची कर्ज काढलेले आहेत. त्यांचे व्याज वाढत आहे. कर्मचाऱ्यांचे पगार थांबलेले नाहीत. लॉकडाऊन उठत नाही, तोपर्यंत अशीच परिस्थिती राहणार आहे.
- रितेश रावखंडे,
उपाध्यक्ष, सातारा पेट्रोल डिलर्स असोसिएशन