CoronaVirus Lockdown : खरशिंगेत १४ दिवस होणार दररोज जंतुनाशक फवारणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 05:38 PM2020-05-13T17:38:32+5:302020-05-13T17:41:20+5:30
खटाव तालुक्यातील खरशिंगे येथे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्यावतीने गावातील कुटुंबांचे सर्वेक्षण सुरू आहे. तसेच लोकांना घरपोच किराणा देण्यात येत आहे. नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
औंध : खटाव तालुक्यातील खरशिंगे येथे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्यावतीने गावातील कुटुंबांचे सर्वेक्षण सुरू आहे. तसेच लोकांना घरपोच किराणा देण्यात येत आहे. नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
कोरोनापासून दूर असलेल्या खटाव तालुक्यात सोमवारी कोरोनाचा शिरकाव झाला. तालुक्याची झोपच उडाली असून, प्रशासनाची पळापळ सुरू झाली आहे. तसेच आसपासची गावे भयभीत झाली आहेत. प्रशासन तळ ठोकून खरशिंगे गावात आहे. तर गावात येणाऱ्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत.
३५० कुटुंबसंख्या व १२०० लोकसंख्या असलेल्या खरशिंगेत आरोग्य विभागाच्यावतीने आठ पथके गावात तैनात करण्यात आली आहेत. सर्वांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे.
तसेच स्वयंसेवकांकडून घरपोच अत्यावश्यक किराणा ही पोहोचवणे सुरू आहे. गावकऱ्यांनी वेळोवेळी आपल्या घरातील सदस्यांनी काळजी घ्यावी, कोणाला कसलाही शारीरिक त्रास जाणवल्यास तत्काळ कळविण्याचे सांगण्यात आले आहे.
तालुक्यातील लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. घाबरून न जाता काळजी घ्यावी, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, प्रशासन योग्य प्रकारे खबरदारी घेत आहे. चुकीच्या बातम्या कोणीही पसरवू नये.
- डॉ. अर्चना पाटील,
तहसीलदार, खटाव.
लोकांनी घाबरून जाऊ नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, घराबाहेर पडू नये, वारंवार हात साबणाने धुवावेत. काही त्रास जाणवल्यास ग्रामस्थांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.
-डॉ. युनूस शेख,
तालुका वैद्यकीय अधिकारी.