CoronaVirus Lockdown : चिमण्यांसाठी बनवली अनोखी पंधरा घरटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 05:20 PM2020-05-28T17:20:42+5:302020-05-28T17:24:08+5:30
पाचगणी : घराघरात फोटोमागे गवत जमा करून गवताच्या घरट्यात किलबिलाट करणाऱ्या चिमण्या दुर्मीळ होऊ लागल्या. याचे गांभीर्य ओळखून लॉकडाऊनच्या ...
पाचगणी : घराघरात फोटोमागे गवत जमा करून गवताच्या घरट्यात किलबिलाट करणाऱ्या चिमण्या दुर्मीळ होऊ लागल्या. याचे गांभीर्य ओळखून लॉकडाऊनच्या काळात महू येथील युवकांनी चिमणी वाचावी म्हणून चिमण्यांसाठी पंधरा घरे बनवून त्यामध्ये चारापाण्याची व्यवस्था केली.
चिमण्यांचा रहिवास असणाऱ्या ठिकाणी ती लटकवली आहेत. त्यामुळे चिमण्यांचा किलबिलाट वाढण्यास मदत होणार आहे. या युवकांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
एकविसाव्या शतकाचा उदय झाला आणि आधुनिक तंत्रज्ञानाने जग व्यापल गेलं. परिणामी मोबाईल क्रांती झाली, त्याचा दुष्परिणाम सुरू झाला अन् चिमण्यांचा रहिवासच संपुष्टात येऊ लागला. त्यांच्या अस्ताची सुरुवात झाली, गावाकडे सहज किलबिलाट करणारी चिमणी दिसेनाशी होऊ लागली.
गावोगावची जुनी कौलारू घरे पाडून त्यांची जागा सिमेंटच्या घरांनी घेतली आहे. त्यामुळे घरातील भिंतीवरील फोटो फ्रेम, आरसे नाहीसे होऊ लागले आणि चिमण्यांचा आवास संपला. याचे कारण कोणालाच उमगले नाही, ज्यांच्या किलबिलटामुळे माणसे सकाळी लवकर उठायची, ती आता मोबाईलचा गजर लावू लागलीत. त्या कर्णकर्कश गजरच्या आवाजाला वैतागून त्यातपण कृत्रिम पक्ष्यांचे आवाज घालून गजर वाजवू लागले.
सर्वांनी तोंडाला मास्क लावून सोशल डिस्टन्सिंग राखत घराच्या मागील मोकळ्या जागेत सर्वांनी मिळून ही लाकडी घरटी बनवली. हळूहळू ही घरटी तयार होऊन त्यासोबत अन्न व पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली.
घरटी बांधायला कोरोनामुळे वेळ...
कोरोनाचा प्रकोप झाला, सर्वांना घरात लॉकडाऊन व्हावं लागलं, वाहने जागेवर राहिल्याने प्रदूषण थांबलं आणि चिमण्यांची किलबिल सुरू असल्याशिवाय यांची संख्या वाढणार नाही, हे सर्वांना जाणवत होते; पण ते करण्यासाठी वेळ मिळत नव्हता. तो वेळ या कोरोनाने दिला.
महू गावात या चिमण्यांची घरटी बनवायची ही संकल्पना गावातील युवक अविनाश गोळे यांनी मांडली. त्यांना अमोल गोळे, राजेंद्र गोळे, सुजित गोळे, गणेश गोळे आणि जयंत जगताप, प्रशांत गोळे, प्रवीण दिलीप गोळे, गणेश गोळे, शिवाजी गोळे प्रत्येकाने आपापल्या परीने सहकार्य केले. कोणी प्लायवूड, तेलडबे, तार, खिळे उपलब्ध करून दिले.
मुंबई येथे काम करीत असताना कामाच्या परिसरात लावलेल्या घरट्यांनी चिमण्यांचा रहिवास वाढला. हीच संकल्पना मनात रुजली, तीच प्रत्यक्षात गावाकडे साकारली.
-अविनाश गोळे, पक्षीमित्र महू, ता. जावळी