CoronaVirus Lockdown : जिल्ह्यात आणखी पाचजण कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 01:17 PM2020-05-18T13:17:50+5:302020-05-18T13:21:13+5:30
सोमवारी एकाच दिवशी पाचजण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये वडील आणि मुलाचा समावेश असून, जिल्ह्याचा आकडा आता १३८ वर पोहोचला आहे. रुग्णांचे निगेटिव्ह अहवालही येण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळत असून, ९३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
सातारा : जिल्ह्यात एकीकडे रुग्णांचे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढत असतानाच दुसरीकडे मात्र, कोरोना बाधितांची संख्याही वाढत आहे. सोमवारी एकाच दिवशी पाचजण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये वडील आणि मुलाचा समावेश असून, जिल्ह्याचा आकडा आता १३८ वर पोहोचला आहे.
रुग्णांचे निगेटिव्ह अहवालही येण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळत असून, ९३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
परजिल्ह्यातून आलेल्या लोकांना प्रवासादरम्यान कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. मूळचे सातारा तालुक्यातील नांदगाव येथील ६७ वर्षीय वडील आणि २६ वर्षीय मुलगा हे दोघे काही दिवसांपूर्वी मुंबई (ठाणे) येथून गावी आले होते. तर मूळची सोलापूर जिल्ह्यातील मुंबईहून प्रवास करून आलेली ३२ वर्षीय महिला साताऱ्यात आली होती.
या तिघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल सोमवारी सकाळी प्राप्त झाला. त्याचबरोबर कऱ्हाड तालुक्यातील उंब्रजमधील २२ आणि ५३ वर्षीय पुरुषालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.
या दोघांवर कऱ्हाड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच दिवशी पाचजण कोरोना बाधित आढळल्याने जिल्हा प्रशासन पुन्हा हादरून गेले आहे.
दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालय येथे २६, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कऱ्हाड येथे ६४ व उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील ३ अशा एकूण ९३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तींची संख्या १३८ झाली आहे. कोरोनामुक्त होऊन ६६ जण घरी गेले आहेत तर दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७० कोरोना बाधितांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.