CoronaVirus Lockdown : साताऱ्यातून साडेचारशे परप्रांतीय विनापरवाना गेले घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 05:36 PM2020-05-18T17:36:19+5:302020-05-18T17:41:38+5:30
लॉकडाऊनमध्ये दोन महिन्यांपासून सुरू असणारी उपासमार अन् हाताला काम नाही. गावी जाण्यासाठी परवानगी मिळेलच, याची शाश्वतीही नसल्यामुळे आॅनलाईन नोंद करूनही सुमारे साडेचारशे परप्रांतीय कामगार साताऱ्यातून विनापरवाना गावी रवाना झाल्याची माहिती पुढे येत आहे.
सातारा : लॉकडाऊनमध्ये दोन महिन्यांपासून सुरू असणारी उपासमार अन् हाताला काम नाही. गावी जाण्यासाठी परवानगी मिळेलच, याची शाश्वतीही नसल्यामुळे आॅनलाईन नोंद करूनही सुमारे साडेचारशे परप्रांतीय कामगार साताऱ्यातून विनापरवाना गावी रवाना झाल्याची माहिती पुढे येत आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे सध्या सर्वच कामगार वर्गावर उपासमारीची वेळ आलीय. प्रत्येकाला आता आपल्या घरी जाण्याची ओढ लागलीय. जिल्हा प्रशासनातर्फे अशा परप्रांतीय कामगारांना आॅनलाईन पास देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामध्ये सुरुवातीला सातशे कामगारांनी आपल्या गावी जाण्यासाठी नोंद केली.
गत आठवड्यात पहिल्या टप्प्यात तीनशे कामगारांना रेल्वेने गावी सोडण्यात आले. त्यानंतर उर्वरित राहिलेल्या कामगारांना रविवारी सोडण्यात येणार होते. त्यासाठी साताऱ्यातील तालीम संघाच्या मैदानावर रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी पाच एसटी बसेसचीही सोय करण्यात आली. यावेळी केवळ दीडशे कामगार या ठिकाणी आले.
मात्र, आॅनलाईन नोंद करूनही तसेच नोंद न केलेले उर्वरित सुमारे साडेचारशे कामगार गावी जाण्यासाठी आले नाहीत. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी परप्रांतीय कामगारांकडे चौकशी केली असता त्यांनी काही दिवसांपूर्वीच अनेकजण गावी गेल्याचे सांगितले.
आॅनलाईन पास मिळाला नाही तर आम्ही इथेच अडकून पडू, अशी धास्ती वाटल्याने अनेक कामगारांनी आॅनलाईन परवानगीची वाट न पाहता गावी जाणे पसंत केले आहे. परंतु एवढ्या मोठ्या संख्येने कामगार गावी गेले असतील तर त्यांना वाटेत कोणी अडवले कसे नाही, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाची संपर्क साधला असता आमच्याकडे अधिकृत आकडेवारी नसल्याचे सांगण्यात आले.