CoronaVirus : मायणीच्या पेरू बागांना लॉकडाऊनचा फटका, लाखोंचे पेरू बागेतच पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 03:06 PM2020-06-09T15:06:16+5:302020-06-09T15:07:55+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत सर्वत्र लॉकडाऊन असल्याने येथील पेरू बागांना मोठा फटका बसला आहे. बागायतदारांचे लाखो रुपयांचे पेरू विक्रीविना बागेतच पडून राहिले आहेत.
संदीप कुंभार
मायणी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत सर्वत्र लॉकडाऊन असल्याने येथील पेरू बागांना मोठा फटका बसला आहे. बागायतदारांचे लाखो रुपयांचे पेरू विक्रीविना बागेतच पडून राहिले आहेत.
सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात मागणी प्रतिवर्षी मायणीच्या पेरूंची असते. परिसरामध्ये शेकडो हेक्टर क्षेत्रांमध्ये पेरूची लागण केली जाते. विविध पेरूंच्या जाती या भागामध्ये आहेत.
या पेरूंना मोठी मागणी असल्यामुळे अनेक शेतकरी पेरू उत्पादन घेत असतात. साधारणपणे एका हेक्टरमध्ये दीड ते दोन हजार पेरू रोपांची लागण केली जात असते. प्रत्येक गावात साधारण एक ते तीन लाखांपर्यंत उत्पादन या भागातील बागायतदार बाराही महिने पेरूचे उत्पादन घेतले जाते.
मात्र, यावर्षी संपूर्ण जगभरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनामार्फत संपूर्ण भागांमध्ये लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे पेरू खरेदी-विक्री करण्यासाठी ग्राहक वर्ग नसल्यामुळे व्यापारी वर्गांनी पाठ फिरवली आहे. याचा फटका पेरू बागांना बसला आहे.
परिसरामध्ये असलेले पेरू उत्पादक मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. विक्रीयोग्य पेरू असतानाही केवळ बाजारपेठ बंद असून, नागरिकांना व ग्राहकांनाही संचारबंदी करण्यात आल्यामुळे तसेच दळणवळण ही मोठ्या प्रमाणात चालू नसल्यामुळे सर्व क्षेत्रात याचा फटका बसत असलेले चित्र दिसत आहे. शासनाने या परिसरामध्ये झालेल्या बागांचे खऱ्या अर्थाने पंचनामे करून बागायतदारांना नुकसान भरपाई देणेही गरजेचे असल्याचे बागातदार याकडून बोलले जात आहे.
मायणीच्या पेरूला राज्यात मागणी...
मायणी परिसर हा पेरू उत्पादनासाठी राज्यभर प्रसिद्ध आहे. या पेरूची राज्यांमध्ये मोठी मागणी असते. विशेष करून पश्चिम महाराष्ट्रसह कोकण किनारपट्टीवर त्या प्रमाणात मायणीचा पेरू विकला जात असतो. मात्र, यावर्षी या पेरूला मोठा फटका बसला आहे.
एक एकर क्षेत्रामध्ये सुमारे ७०० पेरूंची झाडे असतात. या प्रत्येक एकरामध्ये प्रतिदिनी पाच ते दहा हजार रुपयांचा पेरू विक्रीयोग्य होत असतो. मात्र, यावर्षी लॉकडाऊन असल्यामुळे ही विक्री बंद असल्यामुळे पेरू बागेतच सडून जात आहेत. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून लाखोंचा तोटा झाला आहे.
- संजय गुदगे,
पेरू उत्पादक, मायणी