CoronaVirus Lockdown : नीरा पूल बंदमुळे तीन तालुक्यांचे जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 05:52 PM2020-05-18T17:52:32+5:302020-05-18T17:55:53+5:30
फलटण, बारामती आणि इंदापूर तालुक्यांच्या सीमा फलटण तालुक्याच्या पूर्व भागातून वाहणाऱ्या नीरा नदीवर आहे. आसू आणि गोखळी येथील या नदीवर असणारे पूल या तीन तालुक्यांचा संबंध जोडणारा दुवा ठरत आहे; पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने तीन तालुक्यांचे संबंध खंडित होऊन येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
फलटण : फलटण, बारामती आणि इंदापूर तालुक्यांच्या सीमा फलटण तालुक्याच्या पूर्व भागातून वाहणाऱ्या नीरा नदीवर आहे. आसू आणि गोखळी येथील या नदीवर असणारे पूल या तीन तालुक्यांचा संबंध जोडणारा दुवा ठरत आहे; पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने तीन तालुक्यांचे संबंध खंडित होऊन येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आले. या तीन तालुक्यांतील बाजारपेठ, आरोग्य सुविधा, दैनंदिन व्यवहार, शेती या बाबी एकमेकांवर अवलंबून असल्याने या ठिकाणी जिल्हाबंदीचे आदेश शिथिल करण्याची मागणी फलटण तालुक्याच्या पूर्व भागातून होत आहे.
भोर, खंडाळा, फलटण, बारामती, इंदापूर तालुक्यातून वाहणारी नीरा या तालुक्यातील लोकांची जीवन वाहिनी आहे. लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी वरदान ठरली आहे. पाडेगाव, साखरवाडी, होळ, जिंती, फडतरवाडी, सोमंथळी, राजाळे, सरडे, साठे, गोखळी, ढवळेवाडी, आसू या गावांतील नदीकाठचा भाग सुजलाम् सुफलाम् करण्यास उपयुक्त ठरली आहे.
नदीवर अनेक ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असल्याने उन्हाळ्यातही पाणीसाठा उपलब्ध असल्याने परिसरातील लोकांना पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणी टंचाई भासत नाही. त्याप्रमाणे बारामती व इंदापूर तालुक्याला ती अधिक फायदेशीर ठरली आहे. अशा स्थितीत या तिन्ही तालुक्यांतील नागरिकांची महसुली मालमत्ता या भागात विखुरलेली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी आदेश असल्याने आसू ग्रामपंचायतीने आसू-तावशी बंधारा व गोखळी ग्रामपंचायतीने गोखळी पुलावरून वाहतूक प्रशासनाच्या आदेशानुसार बंद केली असल्याने ग्रामस्थांची कुचंबणा होत आहे.
शिवरुपराजे खर्डेकर प्रांताधिकाऱ्यांशी बोलणार
बारामती शहर व फलटण तालुक्याचा पूर्व भाग कोरोनामुक्त आहे. गोखळी पूल व आसू-तावशी बंधारा येथे कडक तपासणी नाके निर्माण करून गरजू लोकांना अलीकडे, पलीकडे जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, यासाठी आपण प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित करून जाण्या-येण्यास परवानगी मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही शिवरुपराजे खर्डेकर यांनी दिली आहे.