CoronaVirus : सातारा नगरपालिका क्षेत्रासह नऊ ग्रामपंचायतीमध्ये लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 11:42 PM2020-04-29T23:42:30+5:302020-04-29T23:43:19+5:30
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सातारा तालुक्यातील खेड, विलासपूर, गोडोली, शाहूपुरी, म्हसवे, सैदापूर वाढे, कोडोली, संभाजीनगर आणि सातारा नगरपालिका क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे.
सातारा : सातारा आणि कराड या शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सातारा शहर, त्रिशंकू भाग आणि जवळपासच्या ९ ग्राम पंचायतीमध्ये लॉक डाऊन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काढलेला आदेश बुधवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आला आहे.
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सातारा तालुक्यातील खेड, विलासपूर, गोडोली, शाहूपुरी, म्हसवे, सैदापूर वाढे, कोडोली, संभाजीनगर आणि सातारा नगरपालिका क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. या प्रतिबंधित क्षेत्रांमधील दवाखाने, हॉस्पिटल, नर्सिंग होम वगळून इतर सर्व प्रकारची दुकाने उद्योग इत्यादी चालू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याबरोबरच अत्यावश्यक सेवेतील घरगुती गॅस सिलेंडर घरपोच वितरण करण्यात येणार असून त्यांना या लॉक डाऊन मधून सूट देण्यात आली आहे.
या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये दूध आणि औषधे ही घरपोच पोहोचण्यात येतील. प्रतिबंधित क्षेत्रातील शहरातील शिवराज, कदम पेट्रोलियम आणि दोशी पेट्रोलियम हे तीनच पेट्रोल पंप अत्यावश्यक सेवेसाठी सुरू ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्याबरोबरच अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असणारे शासकीय, निमशासकीय, खासगी अधिकाऱ्यांनी कर्मचारी यांना यातून वगळण्यात आले आहे.
अत्यावश्यक सेवेमधील शासकीय कार्यालय सुरू राहतील त्याबरोबरच शासनमान्य शिवभोजन थाळी सुविधा देखील सुरू राहणार आहे. सातारा शहरासह जवळपासच्या ग्रामपंचायतीचे क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आल्यामुळे या परिसरातील सर्व सुविधा आणि देण्यात आलेले पासही रद्द करण्यात आले आहेत.