CoronaVirus Lockdown : साताऱ्यात लाल परी धावली; पण प्रवाशांविना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 06:33 PM2020-05-22T18:33:10+5:302020-05-22T18:36:14+5:30
तब्बल दोन महिन्यांपासून एकाच ठिकाणी थांबलेली एसटीची चाकं शुक्रवारी जिल्ह्यांतर्गत फेऱ्यांच्या निमित्ताने सुरू झाली. सकाळी सात वाजता काही गाड्या फलाटाला लागल्याही; पण बसस्थानकच निर्मनुष्य होते.
सातारा : तब्बल दोन महिन्यांपासून एकाच ठिकाणी थांबलेली एसटीची चाकं शुक्रवारी जिल्ह्यांतर्गत फेऱ्यांच्या निमित्ताने सुरू झाली. सकाळी सात वाजता काही गाड्या फलाटाला लागल्याही; पण बसस्थानकच निर्मनुष्य होते.
दुपारपर्यंत अनेक मार्गांवर रिकाम्याच गाड्या धावत होत्या. पहिलाच दिवस असल्याने प्रवाशांना माहिती नव्हती. शनिवारपासून फेऱ्या सुरू होतील, अशा अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर रविवार, दि. २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. त्यामध्ये एसटीच्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यानंतर तब्बल दोन महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती.
दरम्यानच्या काळात केंद्र शासनाने परप्रांतीयांना आपापल्या गावी जाण्याची परवानगी दिली. त्यावेळी एसटीच धावून आली. विविध राज्यांमध्ये परप्रांतीयांना घेऊन एसटी रवाना झाली; पण ही सेवा केवळ परराज्यातील प्रवाशांना अन् तेही ज्यांनी स्वत:ची वैद्यकीय तपासणी केली आहे, जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रवासाबाबत परवानगी घेतली आहे, अशांसाठी होती. सर्वसामान्य प्रवाशांना वाहतूक बंदच होती.
कोरोना बाधित संदर्भातील बदलत्या निर्णयानुसार सातारा जिल्हा ह्यनॉन रेड झोनह्णमध्ये आला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून जिल्हाअंतर्गत प्रवासी फेऱ्या सुरू करण्यात आल्या. एसटीने काही नियम व अटी घातल्या होत्या. यामध्ये प्रत्येक एसटीत पन्नास टक्के म्हणजे केवळ २२ प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.
नियोजनानुसार एसटी शुक्रवारी सकाळी सातपासून सुरू झाली. वेळापत्रकाप्रमाणे एक-एक गाड्या फलाटावर लागत होत्या. नियंत्रण कक्षात नोंद केली जात होती. प्रवासीच फिरकले नाही. वेळ झाली की गाडी आपापल्या मार्गावर मार्गस्थ होत होती. सातारा बसस्थानकात दुपारी तीनपर्यंत हेच चित्र होते.
परप्रांतीय रवाना
करंजे परिसरात राहत असलेले असंख्य परप्रांतीय शुक्रवारी आपापल्या राज्यात गेले. त्यांच्यासाठी एसटीने विशेष गाडी सोडली.