CoronaVirus Lockdown : काटे टाकून गावच्या गावे सील, पिंपरीत जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 06:16 PM2020-05-22T18:16:29+5:302020-05-22T18:17:58+5:30
कोरेगाव तालुक्यातील वेळू व न्हावी बुद्र्रुक या गावामध्ये दोन कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने भीतीपोटी शेजारील गावकरी भयभीत झाले आहेत. खबरदारी म्हणून रहिमतपूरसह परिसरातील गावे लॉक करण्यात आली आहेत. यामध्ये रस्त्यात काटेरी झाडांच्या फांद्या टाकल्या आहेत. पिंपरी येथे जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील वेळू व न्हावी बुद्र्रुक या गावामध्ये दोन कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने भीतीपोटी शेजारील गावकरी भयभीत झाले आहेत. खबरदारी म्हणून रहिमतपूरसह परिसरातील गावे लॉक करण्यात आली आहेत. यामध्ये रस्त्यात काटेरी झाडांच्या फांद्या टाकल्या आहेत. पिंपरी येथे जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
गेल्या दोन महिन्यांमध्ये रहिमतपूर परिसरातील कुठल्याही गावात एकही कोरोनाचा रुग्ण नव्हता. यासाठी प्रत्येक गावाने खबरदारी म्हणून उत्तम नियोजन केले होते. मात्र मुंबईवरून गावाकडे आलेले वेळू आणि न्हावी बुद्र्रुक या गावातील दोघेजण कोरोना बाधित निघाले. याची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीती पसरली.
कुठेतरी नुकतेच निर्बंध शिथिल करण्यात आले होते. परंतु या दोन रुग्णांमुळे पुन्हा रहिमतपूरसह परिसरातील गावे लॉक करण्यात आली आहेत. गावागावात येणारे रस्ते लोखंडी पाईप व लाकडी दांडकी आडवी लावून बंद करण्यात आले आहेत.
पिंपरी येथील ग्रामस्तरीय कोरोना कृती समितीने खबरदारी म्हणून गावात पाच दिवस जनता कर्फ्यू लागू केला आहे. २० ते २४ मे या काळात गावातील किराणा दुकान, दूध संकलन केंद्र, भाजीपाला, फळे विक्री दुकाने दुकाने बंद केली आहेत. गावातून ये-जा करण्यास बंदी केली. जमावबंदी लागू केली असून, विना मास्क व सार्वजनिक जागेवर थुंकल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला समितीने दिला आहे.
घर टू घर सर्वेक्षण सुरू
न्हावी बुद्रुक येथे बाहेरून आलेले २८ लोक शाळेत व अकराजण होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहेत. तर वेळू येथील शाळेत दोन व आठजण होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहेत. वेळू ते न्हावी बुद्र्रुक रोड काट्यांच्या फांद्या टाकून वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून दोन्ही गावांत घराघरात सर्व्हे सुरू केला आहे.