CoronaVirus Lockdown : साताऱ्यात बेरोजगारीला कंटाळून युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 05:00 PM2020-06-15T17:00:53+5:302020-06-15T17:01:45+5:30
सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने अनेकजण बेरोजगार झाले असतानाच एका २३ वर्षीय युवकाने बेरोजगारीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची खळबळजनक घटना रविवारी साताऱ्यात उघडकीस आली.
सातारा : सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने अनेकजण बेरोजगार झाले असतानाच एका २३ वर्षीय युवकाने बेरोजगारीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची खळबळजनक घटना रविवारी साताऱ्यात उघडकीस आली.
ऋषीकेश दत्तात्रय गहीने (वय २३, रा. रमाकांत टॉवर. यादोगोपाळ पेठ, सातारा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, ऋिषीकेश गहीने याच्या आजोबांचे यादोगोपाळ पेठेत इस्त्रीचे दुकान आहे.
या दुकानामध्ये तो आजोबांना मदत करत होता. मात्र, सध्या लॉकडाऊन असल्यामुळे तो इतरत्र नोकरीही शोधत होता. मात्र, त्याला नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे तो नैराश्यामध्ये असायचा. त्याची आई एका ठिकाणी वयोवृद्ध लोकांना सांभाळण्याचे काम करते.
काही वेळाला आईला त्यांच्यात घरी राहावे लागते. तर आजोबा पुणे येथे गेले आहेत. त्यामुळे ऋिषीकेश घरी एकटाच होता. शुक्रवारी रात्री त्याने घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी त्याच्या आईने त्याला फोन केला. मात्र, त्याचा फोन बंद लागला. बॅटरी खराब झाली असेल, असे समजून आईने दुर्लक्ष केले.
पुन्हा रविवारी सकाळी फोन केला असता त्याचा फोन बंद लागला. त्यामुळे त्याच्या आईने नगरसेवक धनंजय जांभळे यांना याची माहिती दिली. जांभळे यांनी पेठेतील काही मुलांना घेऊन ऋषीकेशचे घर गाठले. सर्व मुलांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्यानंतर दरवाजा उघडला गेला. त्यावेळी घरातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आल्यानंतर युवक तेथून बाजूला झाले.
शाहूपुरी पोलिसांना याची माहिती देण्यात आल्यानंतर पोलीसही तत्काळ तेथे पोहोचले. पंचनामा करून पोलिसांनी ऋषीकेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. ऋषीकेशच्या पश्चात आई, विवहित बहीण, आजोबा असा परिवार आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.