CoronaVirus News in Satara : जावळीतील ७० वर्षीय कोरोना बाधित महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 02:41 PM2020-05-31T14:41:20+5:302020-05-31T14:41:46+5:30
CoronaVirus Marathi News and Live updates : जिल्ह्यात एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे.
सातारा : जिल्ह्यात कोरोनाच्या बळींचा आकडा लक्षणीयरित्या वाढत असून, रविवारी जावळी तालुक्यातील वहागाव येथील एका ७० वर्षीय कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाला. तर फलटण तालुक्यातील तांबवे येथील ९४ वर्षीय वृद्धाचा मृत्यू पश्चात कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात बळींची संख्या आता २१ वर पोहोचली आहे. दरम्यान, २६२ जणांचा अहवालही निगेटिव्ह आला आहे.
जिल्ह्यात एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. जिल्ह्यात रविवारी तब्बल २६२ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात २१ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
जिल्ह्यात आत्तापर्यंत ५१६ कोरोना बाधित रुग्णांची संख्या असून, त्यापैकी १५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर २१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३३७ जणांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.