Coronavirus: कोरोनाच्या सावटामुळे पालीची यात्रा साधेपणाने साजरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 08:43 PM2022-01-15T20:43:57+5:302022-01-15T20:44:14+5:30
Coronavirus: येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत कोरोना महामारीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशाच्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या पाल ता.कराड येथे तारळी नदीकाठी गोरज मुहूर्तावर देवाचे मानकरी व सेवेकरी यांच्या उपस्थितीत खंडोबा-म्हाळसा यांच्या मूर्तीचा अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला.
उंब्रज -येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत कोरोना महामारीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशाच्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या पाल ता.कराड येथे तारळी नदीकाठी गोरज मुहूर्तावर देवाचे मानकरी व सेवेकरी यांच्या उपस्थितीत खंडोबा-म्हाळसा यांच्या मूर्तीचा अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला.एरवी भंडार्यात न्हाहून निघाणारी पालनगरी यंदा भंडार्या विना सुनीसुनी दिसत होती.
दरम्यान, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घातलेल्या कडक निर्बंधामुळे पारंपारिक व साध्या पद्धतीने ओपन फुलांनी सजवलेल्या जीप मधून सोबत शिवाजी बुवांचा मानाच्या गाड्यासह देवाचे मानकरी व सेवेकरी यांनी यावर्षी मिरवणूक काढली.
आज विवाह सोहळ्याचा मुख्य दिवस असल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत पालनगरीत येणारे सर्व रस्ते बंद करून बाहेरून येणाऱ्या कोणासही प्रवेश दिला नाही. यात्रेच्या अनुषंगाने पाल नगरीत दि.१४ ते १९ पर्यंत व दि.२३ रोजी देवस्थान ट्रस्ट व पाल गावातील मानकरी सोडुन इतर गावातील, जिल्ह्यातील,इतर राज्यातील भाविकांना दर्शनास मनाई करण्याचे आदेश पारीत करण्यात आले होते.तसेच मंदिर परिसरातील ५ किलोमीटर अंतरावरून नागरिकांना आत येण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला होता.
दुपारी देवाचे मुख्य मानकरी देवराज पाटील यांच्या घराजवळ गावातील मोजकेच मानकरी उपस्थित होते.त्यानंतर मानकरी देवराज पाटील यांचा चिरंजीव तेजराज पाटील यांनी ग्रामप्रदक्षिणा घालत दुपारी खंडोबा मंदिरात आले. यावेळी तेजराज पाटील यांच्या हस्ते देवाची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मानाच्या गाड्यात देवास बसवून अंधार दरवाजापर्यंत देवाची मिरवणूक काढण्यात आली.अंधार दरवाजाजवळ मिरवणूक आल्यानंतर तेजराज पाटील हे पोटास बांधलेल्या श्री खंडोबा व म्हाळसा या देवतांच्या मुखवट्यासह फुलांनी सजवलेल्या ओपन जीप या वाहनात ४.३० वाजता विराजमान झाले.
त्यानंतर मुख्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी उपस्थित नागरिकांनी 'येळकोट येळकोट...जय मल्हार, सदानंदाचा येळकोट..'चा गजर भंडारा खोबर्याची उधळन केली.या मिरवणुकीत गावातील सासनकाठ्या, मानाचा गाडा, फुलांनी सजवलेल्या छत्र्या सहभागी झाल्या होत्या. देवालयातून निघालेली मिरवणूक तारळी नदीत उभारण्यात आलेल्या भराव पुलावरून वाळवंटातून नदीच्या पश्चिमेकडील तीरावर पोहोचली.यावेळी मोजक्याच भाविकांनी भंडारा, खोबऱ्याची उधळण करण्यास सुरूवात केली. मानकरी देवाचे मुखवटे बरोबर घेवून जीपमधून विवाह समारंभासाठी ठराविक वऱ्हाडी मंडळीसमवेत विवाह मंडपाकडे निघाले होते. सायंकाळच्या सुमारास मिरवणूक विवाह मंडपात पोहोचली. मानकऱ्यांनी देवास बोहल्यावर चढविल्यानंतर पारंपारिक पध्दतीने सायंकाळी ५.४० या गोरज मुहूर्तावर श्री खंडोबा व म्हाळसाचा विवाह सोहळा विधीवत पार पडला. यावेळी पुन्हा-पुन्हा 'येळकोट..येळकोट'च्या जयघोषात करण्यात आला.
कोरोना महामारीच्या अनुषंगाने प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे तारळी नदी पात्रात दरवर्षी खचाखच भरणारी यात्रा वाळवंटात मोकळी दिसून येत होती.यात्रा शांततेत व प्रशासनाच्या नियमांचे पालन करून यशस्वीपणे पार पाडण्यासाठी देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी, ग्रामपंचायत व उंब्रज पोलीस ठाणे आणि आरोग्य विभाग सतर्क राहिला होता. यात्रा काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, याकरिता उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उंब्रजचे सपोनि अजय गोरड यांनी १० पोलिस अधिकारी,७९ पोलिस कर्मचारी तसेच स्वयंस्फूर्तीने होमगार्ड बंदोबस्तात सहभागी झाले होते.यावेळी पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील,प्रांताधिकारी उत्तम दिघे, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, सभापती प्रणव ताटे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.