CoronaVirus : जिल्ह्यात आणखी सातजण कोरोना बाधित, बाधितांचा आकडा ५७८ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 04:57 PM2020-06-04T16:57:25+5:302020-06-04T16:59:30+5:30
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच असून, गुरूवारी आणखी सातजण कोरोना बाधित आढळून आले. यामुळे जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा आकडा आता ५७८ वर पोहोचला आहे. तर एका मृत व्यक्तीसह २३७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच असून, गुरूवारी आणखी सातजण कोरोना बाधित आढळून आले. यामुळे जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा आकडा आता ५७८ वर पोहोचला आहे. तर एका मृत व्यक्तीसह २३७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
जिल्ह्यात गत दोन महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. विशेषत: ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण जास्त आहे. बुधवारी रात्री उशिरा ७ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये कऱ्हाड तालुक्यातील खराडे येथील १५ वर्षीय युवक व शिंदेवाडी विंग येथील १५ वर्षीय युवक, शेणोली स्टेशन येथील १४ वर्षीय युवती, वाई तालुक्यातील डुईचीवाडी येथील १५ वर्षीय युवती, सातारा तालुक्यातील कुस बुद्रुक येथील १६ वर्षीय युवक, खटाव तालुक्यातील निढळ येथील २६ वर्षीय महिला तसेच कारंडवाडी ( देगाव रोड ) ता.सातारा येथील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
दरम्यान, एका २७ वर्षीय मृत युवकासह २३७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. संबंधित मृत युवक काही दिवसांपूर्वी पुणे, हडपसर येथून साताऱ्यात आला होता. मृत्यू पश्चात त्याचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. त्याचबरोबर पुणे येथून १२५, कृष्णा मेडिकल कॉलेज, कऱ्हाडयेथून १३, जिल्हा शासकीय रुग्णालय २३, खासगी प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेल्या ७६ अशा एकूण २३७ जणांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत ५७८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी २२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर २४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या ३३१ बाधित रुग्णांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.