CoronaVirus : जिल्ह्यात एका बाधितासह दोन कोरोना संशयितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 04:46 PM2020-05-30T16:46:31+5:302020-05-30T16:48:14+5:30
सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे बळींचा आकडा वाढत असून, शनिवारी एका कोरोना बाधितासह दोन कोरोना संशयितांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात बळींची संख्या आता १९ वर पोहोचली आहे. तसेच १६७ जणांचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे.
सातारा : जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे बळींचा आकडा वाढत असून, शनिवारी एका कोरोना बाधितासह दोन कोरोना संशयितांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात बळींची संख्या आता १९ वर पोहोचली आहे. तसेच १६७ जणांचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे.
जिल्ह्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना बाधितांचा आणि बळींचा आकडा झपाटाने वाढत आहे. जिल्ह्यात शनिवारी रात्री एकूण तिघांचा बळी गेला. त्यामध्ये एका कोरोना बाधिताचा समावेश आहे.
कऱ्हाड येथील मेडीकल कॉलेज येथे उपचार घेणारा विंग येथील रहिवाशी असलेल्या कोरोना बाधित ५० वर्षीय व्यक्तीचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. या व्यक्तीला किडनीचा आजार होता. तसेच कऱ्हाड तालुक्यातील पाठरवाडी येथील कोरोना संशयित ३३ वर्षीय पुरुष व सातारा शहरातील बुधवार पेठेतील ६५ वर्षीय कोरोना संशयित महिलेचा शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला. या दोन्ही रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
दरम्यान, पुणे येथून १३२ तर कृष्णा मेडीकल कॉलेज येथे ३५ अशा एकूण १६७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, जिल्हा शासकीय रुग्णालयात नव्याने ४३ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.