नगरसेवक शिंदे महाबळेश्वरातून तडीपार
By admin | Published: October 27, 2015 10:21 PM2015-10-27T22:21:00+5:302015-10-27T22:43:02+5:30
पोलीस अधीक्षकांचे आदेश : दहशत पसरविणाऱ्या सात टोळ्यांमधील चौदा जणांना ‘चले जाव’
सातारा : मुख्याध्यापकांना मारहाण केल्यामुळे चर्चेत आलेल्या महाबळेश्वरमधील नगरसेवक कुमार गोरखनाथ शिंदे आणि योगेश गोरखनाथ शिंदे या बंधूंना महाबळेश्वर तालुक्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. या दोघांसह जिल्ह्यात दहशत पसरविणाऱ्या विविध सात टोळ्यांतील १४ जणांना वेगवेगळ्या क्षेत्रांमधून तडीपार केल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले आहेत.
महाबळेश्वर परिसरात चोरी, गर्दी-मारामारी, अपहरण, आदेशाचा भंग, जबरी चोरी, घरात घुसून मारहाण, तोडफोड, सरकारी नोकरावर हल्ला असे गंभीर गुन्हे शिंदे बंधूंवर दाखल आहेत. महाबळेश्वर पालिकेची शाळा क्र. १ चे मुख्याध्यापक संजय ओंबळे आणि शाळा क्र. २ चे मुख्याध्यापक जनार्दन कदम या दोघांना मारहाण करून शहरातून धिंड काढल्याप्रकरणी शिंदे बंधूंवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जूनमध्ये घडलेल्या या घटनेत दोघा मुख्याध्यापकांचे कपडे फाडून तोंडाला काळे फासण्यात आले होते. नगरपालिकेच्या बाहेरही या दोघांना मारहाण झाली होती. तत्पूर्वी शाळेत घुसून मुलांचे मोबाइल फोडण्याचा प्रकारही घडला होता.
शिंदे बंधूंना तालुक्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव महाबळेश्वरच्या पोलीस निरीक्षकांनी अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे पाठविला होता. मुख्याध्यापकांना मारहाण प्रकरणाची चित्रफीत अधीक्षकांनी सुनावणीदरम्यान शिंदे बंधूंना दाखविली आणि चित्रफितीत दिसणारे आपणच आहोत हे शिंदे बंधूंनी मान्य केले होते. या
प्रकरणासह विविध गुन्ह्यांतील सहभागाबद्दल दोघांना महाबळेश्वर तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे.
दरम्यान, कऱ्हाड तालुक्यात चोरी, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, चोरीची तयारी, मारहाण, शिवीगाळ, दमदाटी यासारखे गुन्हे करून दहशत पसरविल्याप्रकरणी सलीम ताजुद्दिन मुल्ला (वय २२) आणि सतीश शिवाजी माने (वय ३५, दोघे रा. म्हासोली) या दोघांना हद्दपार करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे. हे दोघे कऱ्हाड, पाटण, कडेगाव, वाळवा, शिराळा या पाच तालुक्यांच्या हद्दीत सहा महिने प्रवेश करू शकणार नाहीत.
घरफोडीचे गुन्हे दाखल असलेल्या सागर संजय शिंदे (वय २०, रा. कापील, ता. कऱ्हाड) आणि अविनाश भीमराव सकट (वय २३, रा. बेघरवस्ती, गोळेश्वर, ता. कऱ्हाड) या दोघांना सातारा व सांगली जिल्ह्यांतून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. कऱ्हाड शहर हद्दीत गंभीर गुन्हे दाखल असलेले अभिजित जगन्नाथ मुळीक (वय २५, रा. हजारमाची, ता. कऱ्हाड) आणि सनी ऊर्फ गणेश सुनील शिंदे (वय २२, रा. ओगलेवाडी, ता. कऱ्हाड) यांना गंभीर दुखापत करणे, मारामारी, आदेशाचा भंग, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल असल्याने कऱ्हाड तालुका हद्दीतून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
सातारा शहर, शाहूपुरी, सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका जुगार व इतर गुन्हे दाखल असलेले समीर सलीम कच्छी (वय ३५, रा. सैदापूर, ता. सातारा), पोपट आनंदा माने (वय ५८, रा. कोडोली, मूळ रा. आरफळ, ता. सातारा) यासीन इकबाल शेख (वय ३३), सचिन सुरेश मोरे (वय ३२, दोघे रा. शनिवार पेठ, सातारा) या चौघांना सातारा तालुका हद्दीतून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून सुधारण्याची संधी देऊनही वर्तनात सुधारणा न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. महिला, मुले, विद्यार्थी, शेतकरी, व्यापाऱ्यांना उपद्रव होत असल्याच्या तक्रारींवरून या सर्वांवर तडीपारीचे प्रस्ताव दाखल झाले होते. सुनावणीअंती अधीक्षकांनी हा निर्णय घेतला असून, आदेशापासून ४८ तासांत या सर्वांनी नेमून दिलेल्या हद्दीबाहेर जायचे आहे. (प्रतिनिधी)
तंटामुक्ती
अध्यक्षाचा समावेश
तडीपारीचा हुकूम बजावण्यात आलेल्यांमध्ये चक्क एका तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षाचा समावेश आहे. सोमनाथ रमेश चव्हाण (वय २४) असे त्याचे नाव असून, तो कालगावचा (ता. कऱ्हाड) रहिवासी आहे. याच गावच्या मयूर महादेव साळुंखे (वय २५) यालाही सहा महिन्यांसाठी कऱ्हाड तालुका हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे.