स्वच्छतेसाठी अधिकाऱ्यांसह नगरसेवक मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:57 AM2021-02-23T04:57:46+5:302021-02-23T04:57:46+5:30
मलकापुरात मोहीम : देशात पहिल्या पाचमध्ये येण्याचा निर्धार मलकापूर : स्वच्छ सर्वेक्षणासाठी मलकापूर पालिका सज्ज झाली असून स्वच्छतेसाठी पालिकेच्या ...
मलकापुरात मोहीम : देशात पहिल्या पाचमध्ये येण्याचा निर्धार
मलकापूर : स्वच्छ सर्वेक्षणासाठी मलकापूर पालिका सज्ज झाली असून स्वच्छतेसाठी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक व कर्मचारी मैदानात उतरले आहेत. शुक्रवारी शिवजयंतीची सुट्टी असूनही सर्वांनी शहरात विशेष मोहिमेअंतर्गत श्रमदानातून स्वच्छता केली. यावेळी स्पर्धेत पहिल्या पाचमध्ये येण्याचा निर्धार पालिका पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
राज्य शासनाच्या सूचनांनुसार मलकापूर शहरात स्वच्छतेविषयी प्रबोधनपर जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत शहरातील विविध संस्थांमार्फत शहर स्वच्छतेसाठी विविध उपक्रम व श्रमदान राबविण्याचे ठरवले आहे. शुक्रवारी शिवजयंतीची शासकीय सुट्टी असूनही पालिकेच्या अधिकाऱ्यांसह नगरसेवक व कर्मचाऱ्यांनी शहरात अहिल्यानगर, शेतकरी भाजी मंडई परिसरात रस्ते सफाई व परिसर स्वच्छता करून विशेष मोहिमेचा प्रारंभ केला. पालिकेच्या विविध उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून मलकापूरला देश पातळीवर अग्रस्थानी ठेवण्याचा निर्धारही केला.
यावेळी नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नगरसेविका स्वाती तुपे, आनंदी शिंदे, नंदा भोसले, गीतांजली पाटील, नगरसेवक किशोर येडगे, सागर जाधव, आबा सोळवंडे, आनंदराव सुतार यांच्यासह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
- कोट
शहरातील महिला, नागरिक, पदाधिकारी, सर्व नगरसेवक व कर्मचाऱ्यांच्या कष्टामुळेच मलकापूर शहराला एक नवीन ओळख मिळाली आहे. कचऱ्याचे वर्गीकरण, प्लास्टिक बंदी, कचऱ्यावर प्रक्रिया अशा पालिकेच्या विविध उपक्रमास सर्वांचा सक्रिय सहभाग लाभला. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ साठीही सर्वांनी एकत्र येऊन विजय मिळवू या.
- नीलम येडगे
नगराध्यक्षा, मलकापूर
- कोट
पालिकेच्या विविध उपक्रमांबाबत नागरिकांना माहिती देऊन त्यांचा सहभाग नोंदविणेबाबत आवाहन केले आहे. या स्पर्धेत देशात पहिल्या पाचमध्ये येण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घ्यावा.
- मनोहर शिंदे,
उपनगराध्यक्ष, मलकापूर
फोटो : २२केआरडी०३
कॅप्शन : मलकापूर येथे स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून अधिकाऱ्यांसह नगरसेवकही या मोहिमेत सक्रिय झाले आहेत.