नगरसेवकांना हवाय वीस लाखांचा निधी !

By admin | Published: January 27, 2016 11:00 PM2016-01-27T23:00:54+5:302016-01-28T00:27:58+5:30

स्थायी समिती आग्रही : विकासकामांना येणार गती; आगामी निवडणुकीची व्यूहरचना

Corporators want a fund of twenty lakhs! | नगरसेवकांना हवाय वीस लाखांचा निधी !

नगरसेवकांना हवाय वीस लाखांचा निधी !

Next

दत्ता यादव -- सातारा --वॉर्डमध्ये विकासकामे करताना निधीची कमतरता भासत असल्याने सर्व नगरसेवकांना २० लाखांचा निधी मंजूर व्हावा, यासाठी स्थायी समितीचे प्रयत्न सुरू झाले असून, येत्या अर्थसंकल्पामध्ये हा विषय सर्वसाधारण सभेमध्ये मांडला जाणार आहे. आत्तापेक्षा हा निधी वाढवून मिळाल्यास विकासकामांना गती येणार असल्याचे सर्व नगरसेवकांचे म्हणणे आहे. हा निधी वाढविल्यास पालिकेच्या तिजोरीवर ताण येणार असल्याने यंदा थकबाकीदारांची वसुली शंभर टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नगरसेवकांना वॉर्डमध्ये विकासकामे करण्यासाठी सध्या प्रत्येकी आठ लाखांचा निधी मिळत आहे. मात्र हा निधी अत्यल्प असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. एखाद्या वॉर्डमधील रस्त्याचे डांबरीकरण करायचे म्हटले तरी हा निधी संपून जातो. त्यामुळे इतर कामे करता येत नाहीत. आरोग्य, पाणी, नागरिकांना बसण्यासाठी सुविधा अशाप्रकारची काहीच विकासकामे करता येत नाहीत. एका गल्लीतील रस्ता पूर्ण करण्यासाठी चार ते पाच लाख रुपये लागतात. मग इतर ठिकाणी विकासकामे करण्यासाठी निधी आणायचा कुठून असाही प्रश्न नगरसेवकांसमोर आवासून उभा आहे. एकाच ठिकाणी निधी खर्च केल्यास अमूक कार्यकर्ता जवळचा म्हणून हा निधी खर्च करण्यात आला, असा मग नगरसेवकांवर आरोप होत असतो. त्यामुळे पालिकेकडून वाढीव निधी मंजूर करून वॉर्डमधील सर्वच नागरिकांना न्याय देता येईल, या हेतूने येत्या अर्थसंकल्पामध्ये हा वाढीव निधीचा विषय प्रामुख्याने पुढे आणला जाणार आहे. यासाठी नगरसेवक निशांत पाटील, अशोक मोने प्रयत्न करत आहेत.
नगरसेवकाला वीस लाखांचा निधी मंजूर झाल्यास वर्षाला आठ कोटी रुपयांचा भार पालिकेला सोसावा लागणार आहे. यासाठी स्थायी समितीमध्ये खल सुरू आहे. पालिकेची जवळपास २० कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल झाल्यास नगरसेवकांना वाढीव निधी मंजूर होण्यास काही अडचण येणार नाही. सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय मंजूर झाल्यास तो जिल्हाधिकाऱ्यांकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.

वसुलीवर मदार !
गेल्या दहा वर्षांपासून एक रुपयाही पालिकेत न भरलेल्या मिळकतदारांची संख्या अधिक आहे. अशा धनाड्य आणि बलाढ्य लोकांकडून यंदा कसल्याही परिस्थितीत वसुली करायचीच, या इराद्याने पालिका वसुली मोहिमेस सुरुवात करणार आहे. ही वसुली झाली तरच नगरसेवकांना २० लाखांचा वाढीव निधी मिळणार आहे. त्यामुळे वसुली मोहिमेमध्ये कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. वसुली चांगल्या प्रकारे झाली, तर निधी मिळणार त्यामुळे वसुलीवरच अवलंबून असल्याचे नगरसेवक निशांत पाटील यांनी सांगितले.

Web Title: Corporators want a fund of twenty lakhs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.