भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा सहसंबंध : पंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:48 AM2021-07-07T04:48:04+5:302021-07-07T04:48:04+5:30
वाई : ‘भाषा, साहित्य आणि संस्कृती या महत्त्वाच्या व एकमेकांना जोडणाऱ्या संकल्पना आहेत. ज्या पद्धतीने राहतो त्यास संस्कृती व ...
वाई : ‘भाषा, साहित्य आणि संस्कृती या महत्त्वाच्या व एकमेकांना जोडणाऱ्या संकल्पना आहेत. ज्या पद्धतीने राहतो त्यास संस्कृती व जे लिहितो त्यास साहित्य म्हणतात. भाषेशिवाय आपण लिहू शकत नाही. भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचा परस्पर सहसंबंध असतो,’ असे प्रतिपादन माजी प्र. कुलगुरू व माजी प्रोफेसर, इंग्रजी व परदेशी भाषा विद्यापीठ, हैदराबाद येथील डॉ. माया पंडित-नारकर यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील इंग्रजी विभाग, संशोधन समिती, अंतर्गत मूल्यमापन हमी कक्ष व भारतीय इंग्रजी भाषा शिक्षक संघटना, सातारा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भाषा, साहित्य व संस्कृती संशोधनविषयक आयोजित राष्ट्रीय वेबिनारमध्ये त्या बीजभाषक म्हणून बोलत होत्या.
डॉ. पंडित म्हणाल्या, ‘भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचा सहसंबंध असल्याने नवसंशोधकांना या क्षेत्रात संशोधनास संधी आहे. दलित साहित्य, आदिवासी साहित्य, कामगार व शेतकऱ्यांचे प्रश्न, अपंगांच्या समस्या अशा अनेक क्षेत्रांमध्ये संशोधनास वाव आहे. भटक्या विमुक्तांचे जीवन, स्त्रीवाद, भाषांतर आणि प्रसारमाध्यमे यावर सखोल संशोधन करण्याची गरज आहे.’
डॉ. तृप्ती करेकट्टी म्हणाल्या, ‘संशोधनात नावीन्य असावे. अभ्यासकांनी नवनव्या संकल्पनांचा वेध घ्यावा, नवसंशोधनाच्या वाटा शोधाव्यात व समाजपूरक संशोधन करावे. समाज आणि साहित्याचा जवळचा संबंध असतो.’
प्र. प्राचार्य प्रा. डॉ. सतीश घाटगे म्हणाले, ‘भाषेचा अभ्यास करताना संशोधकांनी भाषांतराचा पर्यायही स्वीकारावा. एका भाषेतील साहित्य दुसऱ्या भाषेत पोहोचले पाहिजे. संस्कृतीचा, पर्यावरणाचा अभ्यास करून समाजात संस्कृती आणि पर्यावरणविषयी जागृती निर्माण करावी.’
वेबिनारचे उद्घाटन सचिव डॉ. जयवंतराव चौधरी यांनी केले. डॉ. ई. बी. भालेराव यांनी संस्थेची माहिती दिली. प्रा. डॉ. सुनील सावंत यांनी प्रास्ताविक केले. डॉ. संजय दीक्षित व डॉ. मनोज गुजर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. बाळकृष्ण मागाडे यांनी आभार मानले. उपप्राचार्य डॉ. बी. बी. आगेडकर, डॉ. आर. आर. वैद्य, प्रा. व्ही. बी. करडे, डॉ. ज्ञानदेव काळे, डॉ. शिवाजी कांबळे, प्रा. रवींद्र बकरे, समीर पवार उपस्थित होते.