कृषी पुस्तकाच्या नावे साताऱ्यात लाखोंचा भ्रष्टाचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:26 AM2021-06-10T04:26:23+5:302021-06-10T04:26:23+5:30
उंब्रज : कृषी पुस्तिकेच्या नावाखाली सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ११ पंचायत समितींमधून शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. ...
उंब्रज : कृषी पुस्तिकेच्या नावाखाली सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ११ पंचायत समितींमधून शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. शेतकरी नको म्हणत असतानादेखील जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थींकडून कोणतीही पावती न देता, प्रत्येकी २५० रुपये उकळण्यात आले असून, सहा महिने उलटून गेले तरी शेतकऱ्यांना कोणतेही पुस्तक दिले गेलेले नाही, यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांची जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून फसवणूक झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे कऱ्हाड उत्तर तालुका सरचिटणीस प्रशांत देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला.
या संदर्भात चौकशीसाठी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे व साताऱ्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले. प्रशांत देशमुख म्हणाले, ‘सातारा जिल्हा परिषदेत सेस २०२०-२१ अंतर्गत कृषी विभागाच्या कृषी समिती सभेद्वारे शेतकऱ्यांची कृषी साहित्य व अवजारे खरेदीसाठी निवड करण्यात आली व शेतकऱ्यांना पूर्वसंमतीपत्र देऊन साहित्य खरेदी करावयास सांगण्यात आले. साहित्य खरेदी केल्यानंतर सातारा जिल्ह्यातील सर्व पंचायत समितींमधून खरेदी केलेल्या वस्तूंची बिले प्रत्येक पंचायत समितीत संबंधित शेतकऱ्यांना जमा करण्यास सांगण्यात आले. पंचायत समितीच्या कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी कृषी पुस्तिकेच्या नावाखाली शेतकरी नको म्हणत असतानादेखील प्रत्येक लाभार्थीकडून कोणतीही पावती न देता, २५० रुपये गोळा करण्यात आले.
याबाबत प्रशांत देशमुख यांनी स्वत: लाचलुचपत विभाग, सातारा यांच्याकडे तक्रार देखील केली होती. संबंधित अधिकाऱ्यांनी कऱ्हाड पंचायत समितीमध्ये येऊन देशमुख यांच्यासमोर त्यांच्या पद्धतीने कारवाई केली होती. परंतु, गुन्हा दाखल केला नाही.
लाभार्थी शेतकऱ्यांकडून घेण्यात आलेल्या २५० रुपयांचे आजअखेर कोणालाही कृषी पुस्तक मिळालेले नाही. या जमलेल्या लाखो रुपयांचा रकमेचा सातारा जिल्हा परिषदमध्ये भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या संबंधित भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सातारा जिल्ह्यातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्यावतीने प्रशांत देशमुख यांनी केली आहे.