रस्त्याखालचा भ्रष्टाचार ‘रोडरोलर’मुळं उघडकीस
By admin | Published: December 29, 2015 09:58 PM2015-12-29T21:58:10+5:302015-12-30T00:33:29+5:30
साताऱ्यात थरार : भरावाखालच्या प्लॅस्टिक कचऱ्याचं अपघातानंतर दर्शन
सातारा : येथील ७५ मल्हार पेठ शॉपिंग सेंटर लगत असलेल्या रस्त्यावरून आठ टनाचा रोड रोलर गेला त्यामुळे रस्ता खचून रोलर इमारतीच्या तळमजल्यात घुसला. इमारतीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने भरावात टाकलेल्या कचऱ्यामुळेच रस्ता खचला असल्याचा कयास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेबाबत उलट-सुलट चर्चा नागरिक करीत होते.
सातारा पोलीस मुख्यालयापासून प्रकाश लॉजकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यावरच नगरपालिकेची मल्हारपेठ शॉपिंग सेंटर इमारत आहे. या इमारती लगतच ठेकेदाराने भर टाकण्यासाठी फरशी तुकडे, प्लास्टिक पोती ने खड्डा भरला होता. त्यामुळे खड्यातील बहुतांशी भाग हा पोकळ राहिला होता. या रस्त्याचे काम सुरू असताना इमारतीच्या पायापासून डांबरीकरण करण्यासाठी सांगितले असता, याठिकाणी डांबर ,खडी टाकण्यात आली. रस्त्यावरती सपाटीकरण करून रोड रोलर चालक पुढे चालला असता या इमारतीलगतही सपाटीकरण करण्यासाठी नागरिकांनी चालकाला सांगितले. त्यावेळी येथे स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
त्यामुळे चालकाने इमारतीच्या हद्दीतील रस्त्यावरील सपाटीकरणासाठी रोड रोलर आणला. मात्र, रोलरच्या वजनामुळे रस्ता क्षणातच खचला. आणि रोड रोलर इमारतीच्या संरक्षण भिंतीसह तळमजल्यात घुसला.
या घडलेल्या प्रकारात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली, तरी ठेकेदाराने ही इमारत बांधताना गुणवत्तेत तडजोड केल्याचे जाणवले. हलगर्जीपणामुळेच हा अपघात झाला आहे. असे काही नागरिक उघडपणे बोलत होते. तर काही जण दबक्या आवाजात ‘ठेकेदाराची करतुद’ म्हणत होते. (प्रतिनिधी)
भरावासाठी प्लास्टिक पोते
या इमारतीच्या लगत असणाऱ्या फूटपाथ वजा रस्त्यावर भर टाकण्यासाठी ठेकेदाराने मिळेल ती घाण टाकली आहे. यामध्ये फरश्यांची तुकडे उभी-आडवी टाकण्यात आले आहेत. तर सिमेंटचे पोते, कचरादेखील दिसत असल्याने ही भर पोकळ माती असून, रोड रोलरच्या वजनामुळे रस्ता खचल्याचे नागरिक बोलत आहेत.