संसाराची राख; सहा कुटुंबे उघड्यावर
By admin | Published: July 10, 2015 10:06 PM2015-07-10T22:06:40+5:302015-07-10T22:06:40+5:30
केर येथे अग्निकांड : १२ लाखांचे नुकसान; संसारोगपयोगी साहित्य खाक; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे वाचले २५ जीव
पाटण : पाटण शहरापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या केर गावातील यादव कुटुंबियांच्या १५ खणी घरास गुरूवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले.
ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे घरातील लहान मोठी २५ लोकं आणि पाळीव जनावरे सहिसलामत वाचले. मात्र आग आटोक्यात येईपर्यंत सहा कुटुंबातील भांडी, धान्य, कपडे, १५ हजार रोख रक्कम , सोन्या-चांदीचे दागिने, ७० पोती धान्य व इतर साहित्य भस्मसात झाले. पहाटे तीन वाजता आग आटोक्यात आणण्यास ग्रामस्थांना यश आले.
केर, ता. पाटण येथील श्रीरंंग रामचंद्र यादव, परशराम रामचंद्र यादव, नंदकुमार रामचंद्र यादव, मनिषा शंकर यादव, सुनंदा मारूती यादव, निवृत्ती यादव अशी सहा कुटुंब प्रमुखांचे संसार एकाच १५ खणी घरात राहत होती. ९ जुलै रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने घरास आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण केले. गावातील लोक झोपले होते. मात्र काही जण जागे होते त्यामुळे ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात आली.
आरडाओरड झाल्यामुळे इतर गावकरी जमा झाले. पेट घेतलेल्या घरातील लोकांना बाहेर काढण्यात आले. पाळीव जनावरांचे दोर कापण्यात आले व त्यांची सूटका झाली.
या घटेनेची माहिती मिळताच पाटण खरेदी विक्री संघाचा व कऱ्हाड नगरपरिषदेचा अग्निशामक बंब बोलाविण्यात आला. यानंतर ग्रामस्थांच्या साहय्याने आग आटोक्यात आणण्यास यश आले. गावकामगार तलाठी यांनी घटनेचा पंचनामा
केला. (प्रतिनिधी)
मोठा अनर्थ टळला
केर येथील ग्रामस्थ मध्यरात्री गाढ झोपेत होते. घराला अचानक लागलेल्या आगीमुळे गावात नक्की काय झालं हे सुरुवातील कोणालाच समजल नाही. आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या घरनजीक १० ते १२ घरे होती. ग्रामस्थांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे या सर्व घरांचा आगीपासून बचाव झाल्याने मोठा अनर्थ टळला.