‘काळी मैना’ विकून भागविला शिक्षणाचा खर्च !
By admin | Published: June 17, 2015 10:03 PM2015-06-17T22:03:15+5:302015-06-18T00:45:05+5:30
परळी खोरे : मे महिन्याच्या सुटीत करवंदे, जांभूळ विकून मुलांनी गिरवला ‘कमवा व शिका’चा धडा
परळी : शहरातील मुले शाळेला सुटी असली की मामाच्या गावाला जाऊन मौजमजा करीत सुटी आंनदात घालवतात; परंतु परळी, ठोसेघर, कास भागांतील मुलांना मात्र यंदाच्या सुटीत आनंदाला मुकावे लागले.ग्रामीण भागातील मुलांच्या फक्त आई-वडिलांच्या फाटक्या संसाराला मदत करणे, हेच त्यांच्या पाचवीला पुजलेले आहे. उन्हाळ्याच्या सुटीत अनेक मुलांनी डोंगरची काळी मैना विकून शिक्षणाचा खर्च स्वत: भागविला आहे. आई-वडिलांच्या संसाराला मुलांनी एकप्रकारे चांगला हातभार लावला आहे. तसेच पुढील शिक्षणासाठी लागणारा पैसाही या माध्यमातून त्यांनी जमा केला आहे. सातारा तालुक्याच्या पश्चिम डोंगराळ व दुर्गम भाग आहे. यामध्ये परळी, ठोसेघर, कास परिसरातील अनेक गावे आहेत. परळी खोऱ्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी उरमोडी जलाशयात गेल्यामुळे शेतकरी हलाखीच्या परिस्थितीत जगत असतात. संसाराचा गाडा चालवण्यासाठी त्यांना शहरी भागात नोकरी शोधावी लागते. याभागात पावसाचे प्रमाणही जास्त आहे. भात हे मुख्य पीक असल्याने हवामानाच्या अंदाजानुसार इतर पिकांचे उत्पन्न घ्यावे लागते. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुटीमध्ये या परिसरातील मुला-मुलींनी करवंदे, जांभूळ, आळू यांचा व्यवसाय करून शैक्षणिक खर्च स्वत: भागविला.भल्या पहाटे दहा-बाराजणांचे ग्रुप करून मुले-मुली करवंदाच्या जाळ्यातून करवंदे तोडण्याचे काम होते. तसेच डोंगरातील जांभळाच्या झाडावर चढून जांभूळ काढली जात होती. सातारा शहरात किंवा ठोसेघर धबधबा, सज्जनगड, कास पठार आदी ठिकाणी पर्यटक भेट देत असल्याने तेथे मुलांना चांगले पैसे मिळाले. (वार्ताहर)
पर्यटक होतात खूश
ठोसेघर, सज्जनगड येथे अनेक पर्यटक येत असतात. यामध्ये अनेक पर्यटक या मुलांबरोबर बोलत बसतात. यावर मुले आपण कशाप्रकारे रानमेवा आणतो, हे सांगतात. तर काहीजण मुलांवर ‘टायमिंग’ लावतात. मात्र, मुलांनी केलेल्या कष्टाची कहाणी ऐकताच पर्यटक खूश होऊन मुलांना जादा पैसे देतात.
अवकाळी करवंदांना फटका
करवंदे येण्याअगोदर अवकाळी पावसासह सोसाट्याच्या वाऱ्याने करवंदांना फटका बसला होता. अनेक ठिकाणी वणवे लावल्यानेही झाडे जळून गेली होती. त्यामुळे मुलांना करवंदे शोधण्यास जास्त त्रास झाला. मात्र करवंदाला जांभळापेक्षा जास्त मागणी बाजारपेठेत होती. त्यामुळे मुलांचेही यंदा नुकसान झाले आहे.