अधिकाऱ्यांच्या दालनात नगरसेवकाने केला शौचास बसण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 02:11 PM2019-12-13T14:11:47+5:302019-12-13T14:13:39+5:30
माझे विषय अजेंड्यावर घेतले जात नाहीत, प्रभागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे, असा आरोप करत नगर विकास आघाडीचे नगरसेवक विनोद ऊर्फ बाळू खंदारे यांनी शुक्रवारी सकाळी पालिकेत चांगलाच धिंगाणा घातला. उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्या दालनात त्यांनी स्वच्छतागृहाची बादली ठेवली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी टेबलावर शौचास बसण्याचा प्रयत्नही केला. या घटनेचा पालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांकडून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच काम बंद आंदोलनही सुरू करण्यात आले.
सातारा : माझे विषय अजेंड्यावर घेतले जात नाहीत, प्रभागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे, असा आरोप करत नगर विकास आघाडीचे नगरसेवक विनोद ऊर्फ बाळू खंदारे यांनी शुक्रवारी सकाळी पालिकेत चांगलाच धिंगाणा घातला. उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्या दालनात त्यांनी स्वच्छतागृहाची बादली ठेवली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी टेबलावर शौचास बसण्याचा प्रयत्नही केला. या घटनेचा पालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांकडून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच काम बंद आंदोलनही सुरू करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा पालिकेचे कामकाज शुक्रवारी नियमितपणे सुरू होते. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नगरसेवक विनोद ऊर्फ बाळू खंदारे थेट उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्या दालनात आले. दालनात येताच त्यांनी धुमाळ यांच्यापुढे प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.
आमच्या प्रभागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे, प्रशासनाकडून कोणतीही कामे केली जात नाहीत. अजेंड्यावर आमचे विषय घेतले जात नाहीत,ह्ण असा आरोप त्यांनी केला. धुमाळ त्यांना समजविण्याचा प्रयत्न करीत होते; परंतु खंदारे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. काही वेळातच त्यांनी आपल्यासोबत आणलेली स्वच्छतागृहाची बादली उपमुख्याधिकारी यांच्या टेबलावर ठेवली. यानंतर टेबलावर उभे राहून याठिकाणी मी घाण करणार असून, पुढे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या दालनातही घाण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
उपमुख्याधिकारी धुमाळ यांनी खंदारे यांच्या हाताला पकडून खाली बसवले. अजेंड्यावर कोणकोणते विषय घेतले आहेत, याची माहिती त्यांनी खंदारे यांना दिली. यानंतर बाळू खंदारे निघून गेले. दरम्यान, पालिकेत झालेल्या या घृणास्पद प्रकाराचा सर्वच कर्मचाऱ्यांकडून निषेध करण्यात आला.
पालिका सभागृहात तातडीने झालेल्या बैठकीत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. जोपर्यंत बाळू खंदारे स्वत: पालिकेत येऊन माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्ही काम सुरू करणार नाही, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. खंदारे यांनी केलेल्या या अजब प्रकाराची शहरात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.