मतमोजणी केंद्राला सुरक्षेचे कडे! ‘अभिनव’ बंदोबस्त : अतिउत्साही कार्यकर्त्यांवर करडी नजर
By Admin | Published: May 15, 2014 11:32 PM2014-05-15T23:32:43+5:302014-05-15T23:37:39+5:30
सातारा : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून विशेषत: उत्साही कार्यकर्त्यांवर
सातारा : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून विशेषत: उत्साही कार्यकर्त्यांवर पोलिसांची करडी नजर राहाणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक अभिनव देखमुख यांनी केले आहे. शुक्रवार दि. १६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या जळगाव, ता. कोरेगाव येथील गोडावूनमध्ये मतमोजणी होणार आहे. जिल्हा पोलीस दलाच्यावतीने या मतमोजणीसाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामध्ये १ अप्पर पोलीस अधीक्षक, २ पोलीस उपअधीक्षक, ५ पोलीस निरीक्षक, १४ सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, १७४ पोलीस कर्मचारी यांच्यासह केंद्रीय राखीव बलाची १ तुकडी (प्लाटुन), राज्य राखीव पोलीस बलाची १ तुकडी (प्लाटुन) असा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याशिवाय आणिबाणीच्या काळात तत्काळ उपलब्ध होणारे मनुष्यबळ म्हणुन पोलीस मुख्यालयील २ पोलीस अधिकारी यांच्या अधिपत्याखाली २ स्ट्रायकिंग फोर्स, शीघ्र कृती दलाची पथके सतर्क राहाणार आहे. मतमोजणी केंद्रापासुन १०० मिटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ तसेच संपूर्ण सातारा जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रापासून सुरक्षित अंतरावर चार चाकी तसेच दुचाकी वाहन तळाची स्वतंत्रपणे सोय करण्यात आली आहे. मतमोजणीचे निकाल ऐकण्यासाठी येणार्या व्यक्तींसाठी मतमोजणी केंद्रापासुन ३०० मिटर अंतरावर थांबण्याची सोय केलेली आहे. शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत भिवडी ते जळगावकडे जाणारी वाहतूक ही भिवडीकडून जळगावकडे जाण्यासाठी एकेरी राहील. या एकेरी मार्गावरुन येणारी वाहने जळगाव ता. कोरेगाव येथून उजवीकडे वळून कोरेगाव मार्गे सातारा बाजुकडे अथवा डावीकडे वळून सातारारोड-वडूथ मार्गे साताराकडे येतील. या एकेरी मार्गावरुन ट्रक, ट्रॅक्टर अथवा कोणत्याही प्रकारच्या जड वाहनास प्रवेश बंद राहील. या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)