Maharashtra Assembly Election 2019 साताऱ्यात मतमोजणीला लागणार १२ तास--: जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 05:30 PM2019-10-23T17:30:57+5:302019-10-23T17:33:59+5:30
Maharashtra Assembly Election 2019मतमोजणीच्या प्रत्येक राउंडसाठी तब्बल २0 मिनिटांचा वेळ लागेल, त्यामुळे तब्बल १२ तास मतमोजणी प्रक्रिया सुरु राहणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी लोकसभा निवडणूक आल्याने एकाच ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया घ्यावी लागली आहे.
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आणि सहा विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी २४ रोजी साता-यातील वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणीच्या प्रत्येक राऊंडसाठी प्रत्येकी २0 मिनिटे लागणार असून रात्री ८ वाजेपर्यंत ही मतमोजणी प्रक्रिया सुरु राहणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी म्हणाल्या, सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक व आठ विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक निवडणुकीत ६७ टक्के मतदान झाले. निवडणूक विभागाने दिलेल्या अंतीम आकडेवारीनुसार लोकसभेसाठी १२ लाख ३९ हजार ५४८ तर विधानसभेसाठी १६ लाख ७९ हजार ७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. जिल्ह्यातील २९७८ मतदान केंद्रावरुन कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये मतदान यंत्रे मतमोजणीच्या ठिकाणी नेण्यात आली. सातारा, वाई, कोरेगाव, क-हाड उत्तर, क-हाड दक्षिण, पाटण या सहा मतदारसंघातील मतदान यंत्रे सातारा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या वखार महामंडळाच्या गोदामात आणून ठेवण्यात आली.
याच ठिकाणी लोसभा व सहा विधानसभा मतदारसंघांची गुरुवार, दि. २४ रोजी मतमोजणी प्रक्रिया राबविली जाणार आहे. तर फलटण व माण मतदारसंघांची अनुक्रमे फलटण व दहिवडी या ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे.
मतमोजणीची पूर्ण तयारी झाली असून सहा विधानसभा मतदारसंघांसाठी स्वतंत्र मतमोजणी हॉल असणार आहे. प्रत्येक हॉलमध्ये लोकसभेसाठी त्या त्या विधानसभा मतदारसंघातून झालेल्या मतदानाची मोजणीही केली जाणार आहे.
सातारा विधानसभा मतदारसंघाची १४ टेबलवर मतमोजणी होणार असून ३१ राउंड घ्यावे लागणार आहे. पाटणसाठी १२ टेबलवर तर ३३ राऊंड, वाईची ११ टेबलवर मतमोजणीचे ३२ राउंड होतील. कोरेगावची ११ टेबलवर ३२ राउंड होतील. क-हाड उत्तरची ११ टेबलवर ३१ राउंड होतील. क-हाड दक्षिणची १0 टेबलवर ३0 राउंड होतील. मतमोजणीच्या प्रत्येक राउंडसाठी तब्बल २0 मिनिटांचा वेळ लागेल, त्यामुळे तब्बल १२ तास मतमोजणी प्रक्रिया सुरु राहणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी लोकसभा निवडणूक आल्याने एकाच ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया घ्यावी लागली आहे.
प्रत्यक्ष मतमोजणी टेबलावर सातारा येथे ११७८ कर्मचारी असतील. तर फलटण व माण येथे मिळून १२६ कर्मचारी असतील तर मतमोजणीच्या ठिकाणी एकूण ३ हजार कर्मचारी काम पाहतील. तर २ हजार पोलीस कर्मचारी बाहेर पहारा देणार आहेत.
मतदानावेळी मशिन बदलाव्या लागल्या
मतदान प्रक्रियेवेळी बिघाड झाल्याने बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट व सीयु या मशिन्स बदलाव्या लागल्या. बॅलेट युनिट व सीयु या प्रत्येकी २0 तर ११२ व्हीव्हीपॅट मशिन्स ऐनवेळी बदलण्यात आल्याची माहितीही जिल्हाधिकाºयांनी दिली.
- निकालाच्या ठिकाणी गर्दी करु नये : पोलीस अधीक्षक
नागरिकांना लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा निकाल घरात बसूनही पाहता येणार आहे. सोशल मिडियावर तसेच महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरही निकाल पाहता येणार असल्याने नागरिकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी करु नये. मतमोजणीनंतर दिवाळी आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले.