देशाला शांतीची नव्हे क्रांतीची गरज
By admin | Published: September 20, 2016 11:25 PM2016-09-20T23:25:05+5:302016-09-20T23:47:48+5:30
मनोज कुमार : बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंशी साधला संवाद
सातारा : ‘आज देशात जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती बदलणे अत्यावश्यक आहे. परिस्थिती बदलण्याची जबाबदारी भावी पिढीवर असून, त्यासाठी स्वत: तंदुरुस्त असले पाहिजे. देशाला शांततेची नव्हे तर, क्रांतीची गरज असून ही क्रांती घडवण्यासाठी युवा पिढीने खेळाच्या माध्यमातून प्रयत्न करावेत,’ असे आवाहन अर्जुन पुरस्कार विजेते बॉक्सर मनोज कुमार यांनी केले. दरम्यान, आपणही एक मराठा असून, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नितांत आदर असल्याचेही यावेळी सांगितले.
जिल्हा क्रीडा संकुलातील बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्रातील युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील, मानद एनआयएस प्रशिक्षक सागर जगताप, अमर मोकाशी, विभागीय सचिव योगेश मुंदडा आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बॉक्सर जयसिंग पाटील यांच्यासमवेत मनोज कुमार यांनी सातारा क्रीडानगरीला भेट दिली. यावेळी सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे व विविध मान्यवरांनी त्यांचे साताऱ्यात स्वागत केले. जयसिंग पाटील यांनी मनोज कुमार यांचा परिचय दिला.
मनोज कुमार म्हणाले, ‘सातारा बॉक्सिंग अॅकॅडमीने गेल्या वर्षभरात केलेली कामगिरी अलौकिक आहे. काहीतरी बनायचे आहे, करिअर करायचे आहे, यासाठी बॉक्सिंग खेळ चांगलाच आहे पण, काहीही करता नाही आले तरी आपले शरीर तंदुरुस्त बनवण्यासाठी बॉक्सिंग सारखा खेळ नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे. आज देशाची परिस्थिती पाहिली की, शिवाजी महाराजांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. शिवाजी महाराजांनी मावळ्यांना एक दिशा दिली होती. त्यामुळे एक राष्ट्र निर्माण झाले होते.’
यावेळी त्यांनी खेळाडूंशी मोकळेपणाने गप्पा मारल्या. सातारा बॉक्सिंग अॅकॅडमीच्या वतीने मनोज कुमार यांना शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. मनोज कुमार यांच्या हस्ते शालेय हॉलीबॉल आणि बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी राजेंद्र हेंद्रे, डॉ. राहुल चव्हाण, दौलतराव भोसले, हरीष शेट्टी, रवींद्र होले, प्रा. संभाजी पाटील, प्रा. गुजर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी, क्रीडा शिक्षक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)