अपघातात दाम्पत्य ठार; दोन मुले गंभीर
By admin | Published: September 11, 2016 11:53 PM2016-09-11T23:53:11+5:302016-09-11T23:53:11+5:30
मालखेड फाट्यावर दुर्घटना : टँकरला धडक देत कार झाडावर आदळली
मलकापूर : कार झाडावर आदळून दाम्पत्य ठार तर त्यांची दोन मुले गंभीर जखमी झाली. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले.
प्रवीण मोहन तुळसकर (वय ५०), प्रिया प्रवीण तुळसकर (४५) अशी अपघातात ठार झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. तर प्रथमेश तुळसकर (२५) व पार्थ तुळसकर (२३, रा. १३/२०, ००४ ए सत्यम, जनरल ए. के. वैद्य मार्ग, गोकूळधाम, गोरेगाव-मुंबई) या दोन जखमी मुलांवर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव-मुंबई येथील प्रवीण तुळसकर हे पत्नी प्रिया, मुले प्रथमेश व पार्थ यांना घेऊन नागझर-गोवा येथे गेले होते. रविवारी ते तेथून पुन्हा कारने (एमएच ०२ बीवाय ४००२) मुंबईकडे निघाले. दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास कार कऱ्हाड तालुक्यातील मालखडे फाटा येथे पोहोचली. त्यावेळी दुधाच्या टँकरला पाठीमागील डाव्या बाजूस कारची धडक बसली. त्यानंतर चालकाचा ताबा सुटून कार उपमार्गाच्या दिशेने जात बाभळीच्या झाडावर आदळली. ही धडक एवढी भीषण होती की, कारची चालकाकडील बाजू इंजिनसह काचेपर्यंत तुटली होती. अपघात निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थ व प्रवाशांनी त्या ठिकाणी धाव घेतली. कऱ्हाड तालुका पोलिस ठाणे, महामार्ग पोलिस व महामार्ग देखभाल विभागाचे अधिकारी व कर्मचारीही तातडीने अपघातस्थळी धावले. त्यांनी कारमधील चारहीजणांना बाहेर काढून उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच प्रवीण व प्रिया यांचा मृत्यू झाला. तर प्रथमेश व पार्थ गंभीर जखमी आहेत. (प्रतिनिधी)
अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार
४उंब्रज : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिवडे, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार झाला. रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
४घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर-सातारा लेनवर रविवारी सायंकाळी एका वृद्धाला अज्ञात वाहनाने धडक दिली. धडकेत वृद्ध गंभीर जखमी झाला. मात्र, संबंधित वाहनासह चालकाने तेथून पलायन केले. अपघात निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. तसेच रुग्णवाहिकेलाही माहिती देण्यात आली. मात्र, रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचेपर्यंत संबंधित वृद्धाचा मृत्यू झाला. संबंधित वृद्धाची ओळख रात्री उशिरापर्यंत पटली नव्हती. अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसांत झाली नव्हती.