कौशल्यतेने यारी चालविणाऱ्या धाडसी रणरागिणी!
By admin | Published: September 9, 2016 11:25 PM2016-09-09T23:25:10+5:302016-09-10T00:40:11+5:30
बेलमाचीच्या आम्ही चौघी : पुरुषांइतकाच रोजगार देऊन बुलंद केला महिला समानतेचा नारा
भुर्इंज : धडधडणाऱ्या याऱ्या... खोलवर गेलेल्या बकेटमध्ये दगड, मुरूम, माती किंवा गाळ भरला की सराईतपणे गियर टाकायचा, लिव्हरवर दाब देतानाच ब्रेकवरदेखील नियंत्रण ठेवायचे. बकेटवर उचलून पुन्हा सारी यारी उलट्या दिशेला फिरवून बकेट रीती करायची. यात थोडीजरी चूक झाली तरी दोर तुटून बकेट खाली कोसळणार आणि उभ्या असलेल्या मजुरांच्या जीवाशी खेळ होणार, असे हे धोकादायक काम. हे काम अत्यंत कौशल्यतेने बेलमाचीच्या सुनिता बोडरे सवंड्यांबरोबर करत आहेत.
महिला आता पायलट झाल्या आहेत, दुचाकीपासून ट्रॅक्टरटरपर्यंत सारी वाहनं चालवू लागल्या आहेत. त्याचप्रमाणे आता उपेक्षित समाजातील महिला दोन वेळच्या अन्नासाठी वाहन चालवण्यापेक्षाही कठीण आणि धोकादायक असलेल्या यारी चालवण्याचे काम करताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे हे काम करणाऱ्या महिलांना हे शिक्षण कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये मिळाले नाही किंवा यातील अनेकांनी शाळेचे तोंडही पाहिले नाही. तरीदेखील केवळ आत्मविश्वासाच्या आणि जन्मजात अंगी असलेल्या उर्मीच्या बळावर महिलांनी हे काम आत्मसात केले आहे. एका दिवसात सुमारे १० ब्रास मुरूम, माती, दगड, गाळ काढण्याचे काम एका यारीच्या साह्याने होते. एका यारीसोबत सहा मजूर राबतात. या सर्वांमध्ये सर्वात कसबीचे काम हे यारी चालवण्याचे असते.
काही काही ठिकाणी तर हे काम करणाऱ्या ठेकेदारांच्या घरी असणाऱ्या या याऱ्या चालवण्यास लहान वयातच त्या घरातील काही तरुणी शिकल्या आहेत. त्यांनी त्यांच्या कामातून एवढा आत्मविश्वास निर्माण केला आहे की, पुरुषांपेक्षा आता त्यांच्यावरच या धोकादायक कामाची जबाबदारी निर्धास्तपणे सोपवली. संधी मिळाली, की स्वत:ला सिद्ध करणाऱ्या महिलांनी जगण्यासाठी शोधलेली ही संधी यशस्वी केली आहे. (प्रतिनिधी)
यारी चालक ते ठेकेदार...
वाई तालुक्यातील बेलमाची गावच्या सुजाता बोडरे या महिला स्वत: यारी चालवतातच शिवाय आता या कामातील ठेकेदार म्हणून सर्वपरिचित आहेत. त्या म्हणाल्या, ‘चारचाकी गाडी चालवणं खूप सोपं; पण ही यारी चालवणं अवघड! जरा कुठं इकडं तिकडं झालं तर एक-दोन माणसांच्या जीवावर बेतलंच समजा. त्यामुळं फार धोक्याचं काम आहे हे. आम्ही बायका आता या याऱ्या चालवतो पोटाच्या भुकेने या कामाकडं आम्हाला वळवलं आहे. डोक्यावर दगड-धोंडी वाहायची म्हणून पुरुषांच्या बरोबरीने असे काम करायला सुरुवात केली. इतर रोजगाराच्या कामात बाईला पुरुषांपेक्षा कमी रोजगार मिळतो. मात्र या कामात बाईला आणि पुरुषाला मात्र बरोबरीचा रोजगार आहे. यावरून या कामाचं मोल कळलं. पुरुष मंडळी थोडा वेळ तरी इकडं तिकडं घालवतील; पण आम्हा बायकांचं तसं नाही. एकदा सकाळी कामाला सुरुवात केली की थेट दुपारी जेवायलाच सुटी आणि त्यानंतर दिवस सरल्यावर दिवसाचीच सुटी. या आत्मविश्वासावरच आता मी स्वत: ठेकेदार झाले. माझी स्वत:ची क्रेन आणि १२ मजूर माझ्याकडे काम करतात. त्यामध्ये ४ महिला असून, त्यांना आणि गड्यांना एकसारखाच रोजगार आहे.’
पहिल्यांदाच झाल्या कौतुकाच्या धनी
किसन वीर कारखान्यावर नुकतेच गाळ काढण्याचे काम करताना आठ याऱ्या वापरल्या गेल्या. विशेष म्हणजे या आठही याऱ्यांवर चालक म्हणून महिलांनीच काम केले. त्याची चर्चाही झाली. त्यामुळे कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी आवर्जून कामाच्या ठिकाणी जाऊन या महिलांच्या कामाची दखल घेत त्यांच्या कामाचे कौतुक केले. घरात कारभारीण असणाऱ्या महिला जगण्याची लढाई लढताना घरातील साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडून पुन्हा या पुरुषांच्या कामामध्ये पुरुषांना मागे टाकून या कामाच्याही कारभारी झाल्या. मात्र, त्यांची दखल या ठिकाणी पहिल्यांदाच घेतली जाऊन त्या कौतुकाच्या धनी झाल्या. यावेळी संचालक पै. मधुकर शिंदे, नवनाथ केंजळे, शेखर भोसले-पाटील, विराज शिंदे, संदेश देशमुख, संजय भोसले, नितीश शिंदे, जालिंदर भोसले आदी उपस्थित होते.