अंगणवाड्यांना मिळेना हक्काचं अंगण!
By admin | Published: February 22, 2016 12:04 AM2016-02-22T00:04:42+5:302016-02-22T00:04:42+5:30
जिल्ह्यातील स्थिती : अडीच हजार इमारती बांधकामाच्या प्रतीक्षेत; मंदिर, समाजमंदिर, खासगी इमारतीत ज्ञानदानाचे काम
सातारा : जिल्ह्यातील २ हजार ४८० अंगणवाड्यांना अद्यापही हक्काचे छप्पर मिळाले नाही. या अंगणवाड्या सध्या मंदिर, समाजाचे सभागृह, खासगी इमारत, प्राथमिक शाळा या ठिकाणी भरविल्या जात आहेत. खासगी संस्थांच्या तुलनेने अंगणवाडीकडेच सामान्य नागरिकांचा ओढा असल्याने शासनाने अंगणवाड्यांसाठी हक्काची इमारत बांधण्यासाठी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
सातारा जिल्ह्याला शैक्षणिक परंपरा लाभलेली आहे. खासगी शाळांचे पेव फुटले असले तरी विशेषत: ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य पालक आपली मुले अंगणवाड्यांमध्येच आपल्या पाल्यांना दाखल करत असतात. अंगणवाड्यांमध्ये शिक्षणासोबतच मोफत पोषक असा शालेय पोषण आहार दिला जातो. त्यामुळे कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी अंगणवाड्या वरदान ठरतात. जिल्हा परिषदेच्या बालविकास विभागाच्या माध्यमातून २ कोटी ४०लाखांचा निधी पोषण आहारावर खर्च केला जातो.
जिल्ह्यामध्ये ८० हजार ५०९ इतके विद्यार्थी अंगणवाड्यांमध्ये शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना ३ हजार ८८७ अंगणवाडी सेविका व ३ हजार ८२४ मदतनीस ज्ञानदानाचे काम करत आहेत. ४०० लोकसंख्येच्या खाली असणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये ७८१ सेविका शिकवितात. सध्या २ हजार ३१९ अंगणवाड्यांना हक्काच्या इमारती आहेत.
शासनाच्या निधीतूनच या इमारतींची डागडुजी केली जाते. मात्र, खासगी जागांतील इमारतींमध्ये गैरसोयींचा सामना करावा लागतो. या खासगी इमारतींच्या बाजूला असणारी अस्वच्छता, आजूबाजूचा गोंधळ यामुळे शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होताना दिसत असतो.
तसेच या मुलांना याच बकाल परिस्थितीमध्ये पोषण आहार खावा लागतो. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचे तीन-तेरा वाजतात.
या पार्श्वभूमीवर हक्काच्या इमारतीत अंगणवाड्या गेल्या तर तेथील शिक्षणाचा दर्जा सुधारणे शक्य होऊ शकते. सातारा जिल्हा परिषद प्रशासनाने आणखी १२५ इमारतींची कामे हाती घेतली आहेत. तसेच ३०८ अंगणवाड्यांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आले आहेत. ही कामे जिल्हा नियोजनच्या माध्यमातून केली जाणार आहेत.